खासगी सावकारीतून हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

जामसांडेकर यांनी माझ्यावर हल्ला केला असून मी त्यामध्ये जखमी झालो अशी परस्पर विरोधी फिर्याद कुलदीप गायकवाड यांनी दिली

कोल्हापूर - सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता.27) रात्री राजारामपूरी येथे घडली. यामध्ये हॉटेल व्यावसायिक वल्लभ राजेंद्र जामसांडेकर (वय 32, रा.राजारामपूरी 1 ली गल्ली) हे जखमी झाले. हा चाकू हल्ला सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड (वय 36, रा.महालक्ष्मी नगर) यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान जामसांडेकर यांनी माझ्यावर हल्ला केला असून मी त्यामध्ये जखमी झालो अशी परस्पर विरोधी फिर्याद कुलदीप गायकवाड यांनी दिली. राजारमपूरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वल्लभ जामसांडेकर हे राजारामपूरी पहिल्या गल्लीतील सिल्वर मेट्रो हॉटेल चालवतात. पाच वर्षापूर्वी कुलदीप गायकवाड यांच्याशी त्यांची ओळख झाली. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी गायकवाड यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपये 7 टक्के व्याजाने घेतले. कुलदीप गायकवाड परत केलेल्या रक्कमेवरील व्याजाची वारंवार मागणी करत होता. मंगळवारी रात्री कुलदीप गायकवाड हॉटेल समोर आला. त्याने जामसांडेकर यांना बाहेर बोलावले व पैशाची मागणी केली. जामसांडेकर यांनी तुमचे 80 हजार रुपये मी दिले आहेत असे सांगितले. दोघांच्यातील वाद वाढला व गायकवाड यांनी जामसांडेकर यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढला व जामसांडकेर यांच्या पोटात खुपसला. जामसांडेकर ओरडताच हॉटेलमध्ये असणारी त्यांची पत्नी व कामगार बाहेर आले. आजुबाजूचे लोकही तेथे आले. त्यावेळी कुलदीपने तेथून पळ काढला. जामसांडेकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान कुलदीप गायकवाड यांनी जामसांडेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. जामसांडेकर हा माझा कॉलेजमधील मित्र आहे. चार वर्षापूर्वी त्याने माझ्या दुकानात येऊन सोन्याच्या दोन चेन गहाण ठेऊन पैसे घेतले. हा व्यवहार झाला तेव्हा मी दुकानात नव्हतो. दुकानात आल्यावर मी पाहिले तर सोन्याच्या चेन खोट्या होत्या. याबाबत विचारणा केल्यावर जामसांडेकर याने चेन खोट्या असल्याचे मान्य केले. मित्र असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व पैसे परत दे असे सांगितले. सोमवारी (ता.26) जामसांडेकर भेटल्यावर त्याला पैशांची विचारणा केली.

हे पण वाचालॉकडाऊनमध्ये दोघांनी चोरल्या तब्बल 15 दुचाकी

उद्या देतो असे त्याने सांगितले. त्याच पैशांची विचारणा करण्यासाठी मंगळवारी (ता.27) त्याच्या हॉटेलवर गेलो असता त्याने भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने माझ्यावर हल्ला केला. यामध्ये माझ्या उजव्या हाताला व छातीला दुखापत झाली. त्यामुळे मी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. असे कुलदीप गायकवाड याने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक एस.एल.डुबल करत आहेत

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on hotelier from private lender in kolhapur