चांगल्या कामासाठी "नागपूर'चे गिफ्ट...! ; प्रेरणा कट्टे, गणेश बिरादार यांची बदली 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

शहर पोलिस उपअधीक्षक पदाची सूत्रे दीड वर्षांपूर्वी प्रेरणा कट्टे यांनी हाती घेतली. मावळते पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारवाईचा धडाका लावला.

कोल्हापूर - काळेधंदेवाल्यांसह संघटित गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याचे उल्लेखनीय काम करणाऱ्या शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व इचलकरंजीचे उपअधीक्षक गणेश बिरादार यांना "नागपूर' गिफ्ट मिळाले. पोलिस दलात डॅशिंग अधिकारी म्हणून चांगले काम केले तर त्याची गैरसोईच्या ठिकाणी बदली होते हे, या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून पुन्हा अधोरेखित झाले. 

शहर पोलिस उपअधीक्षक पदाची सूत्रे दीड वर्षांपूर्वी प्रेरणा कट्टे यांनी हाती घेतली. मावळते पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारवाईचा धडाका लावला. गुंडगिरी, अवैध धंदे मोडून काढले. यादवनगर येथे संशयित सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. मुल्लाच्या साथीदारांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस यंत्रणेने मुल्ला गॅंगवर थेट मोका अंतर्गत कारवाई केली. गुन्ह्याचा तपास शहर उपअधीक्षक कट्टे यांनी सक्षमपणे केला. एक दोन नव्हेतर गुन्ह्यात 44 जणांवर कारवाई केली. त्यातील 42 जणांना अटकही केली. याच प्रकरणातील सम्राट कोराणे याला अजून अटक व्हायची आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याने धाव घेतली; पण न्यायालयानेही त्यांना शरण येण्यास सांगितले. एवढा खोलवर तपास या प्रकरणाचा कट्टे यांनी केला आहे. इतकेच नव्हेतर कोल्हापुरातील मटक्‍याचे इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गुजरात कनेक्‍शन शोधून काढले. गांजाविरोधात आक्रमक पावले उचलली. त्यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी पोलिसांनी गांजाचे मिरज, पंढरपूर, ओडिसा, आंध्रपर्यंतचे कनेक्‍शन शोधून काढले. मटका, जुगार अड्डे चालवले तर मोका अंतर्गत कारवाई अटळ अशी धास्ती काळेधंद्यांच्यात निर्माण झाली होती. कट्टे यांच्या कार्याची पोलिस महासंचालक कार्यालयानेही दखल घेत त्यांना एक लाखाचे पारितोषकही देऊन गौरविण्यात आले. 

पोलिस उपअधीक्षकपदाची गणेश बिरादार दीड वर्षापासून इचलकरंजीत आहेत. तेलनाडे गॅंगवर मोका अंतर्गत कारवाईने छाप पाडली. त्याचबरोबर फाळकूटदादा, घरफोड्यांना जेरबंद करणे अशा धाडसी कारवाई केल्या. लॉकडाऊन काळात थेट रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रबोधनाची मोहीम राबवली. सक्षमपणे केलेल्या चांगल्या कामाबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांना बदलीरूपाने चांगले गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती; पण त्यांची थेट नागपूरला झालेल्या बदलीने चांगले काम करणाऱ्यांची गैरसोईच्या ठिकाणी बदली होते हे पुन्हा अधोरेखित झाल्याचा सूर जिल्हावासीयांतून उमठत आहे. 

हे पण वाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी गाठला हरपवडे धनगरवाडा

 

सूरज गुरव यांना वाद भोवला 
कऱ्हाड शहरचे पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांचीही अवघ्या वर्षभरात नागपूरलाच तडकाफडकी बदली केली. श्री. गुरव व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूर पालिकेच्या महापौर निवडीवेळी वाद झाला होता. त्या वेळी श्री. गुरव करवीरचे पोलिस उपअधीक्षक होते, त्यातून त्यांची बदली रत्नागिरीला व तेथून कऱ्हाडला झाली होती. वर्षाच्या आतच त्यांच्या झालेल्या बदलीमागे श्री. मुश्रीफ यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचे बोलले जाते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur City Police Superintendent Prerna Katte ransfered nagpur