वाद्यांच्या गजरात वाजत्रींनी वेधले लक्ष का वाचा...?

संभाजी गंडमाळे
Monday, 7 September 2020

वाद्यपथकांना लवकरात लवकर परवानगीची मागणी 

कोल्हापूर : सलग दोन वर्षे ऐन हंगामात घरी बसावे लागल्याने आता वाद्यपथकांचे मालक आणि कलाकारांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. वाद्यपथकांकडे मनोरंजनाचा भाग म्हणून न पाहता उपयुक्त व्यवसाय म्हणून पहावे आणि शासनाने वाद्यपथकांना लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी आज येथील बॅंड-बेंजो, सनई-चौघडा, तुतारी, ढोलताशा, हालगी वाजंत्री संघटनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध वाद्यांच्या गजरात निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले. 

गेल्या वर्षी महापुराने सर्वच कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने झाले. त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर वाद्यपथकांना बसला. यंदा ऐन हंगामात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि तेंव्हापासून गेली साडेपाच महिने वाद्यपथकांवर बंदी आहे. वाजंत्री व्यवसायावर पाच ते सहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.

हेही वाचा - कळतय पण वळत नाही : बेडसाठी दिवसभर; इंजेक्‍शनसाठी रात्रभर अन् मास्क मात्र हनुवटीवरच

मात्र, लॉकडाऊनमुळे या पथकाच्या मालकांबरोबरच वादक कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाद्यपथकांना परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार साळोखे, उपाध्यक्ष सुभाष माने, सुनील धुमाळ, अतिश कदम, राजू शिंदे यांच्यासह वाद्यपथकांचे मालक व कलाकार आंदोलनात सहभागी झाले.  

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur district administration by protesting in front of the Collector office with various musical instruments