कोल्हापूर जिल्ह्याला मिळाले 37 हजार कोरोना व्हॅक्‍सीन

सुनील पाटील 
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरक्षित आणि योग्य प्रकारे केले जाणार आहे

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात 37 हजार 580 व्हॅक्‍सीन आज मिळाले आहेत. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. लसीकरणाच्या नियोजन व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरक्षित आणि योग्य प्रकारे केले जाणार आहे. लसीकरण मोहिमेसाठी सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्‍टर्स यांनी सहभाग घेतला पाहिजे. जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी, सापीपीआर, महापालिकेकडून अशा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेवून याची माहिती द्यावी.

लसीकरणामध्ये धर्मगुरूंनाही निमंत्रित करावे. शनिवारी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व लोकप्रतिनिधींना नजिकच्या केंद्रांवर बोलावून त्यांच्या उपस्थितीत आणि सुरक्षिता बाळगून लसीकरणाला सुरुवात करावी. तर, पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असेही आवाहन श्री देसाई यांनी केले. तत्पूर्वी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूख देसाई यांनी लसीकरणाची संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली.

हे पण वाचा 'धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा' 
 

यावेळी,आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur district got 37 thousand corona vaccines