कोल्हापूर पूरग्रस्तांच्या व्यथा : मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

kolhapur flood memories story  flood victims expressed near Sakal
kolhapur flood memories story flood victims expressed near Sakal

कोल्हापूर : ‘कधी नव्हे ते गेल्या वर्षी महापुराच्या पाण्यात अख्खा संसार बुडाला. होत्याचं नव्हतं झालं. पण, खचून कसं चालेल? पुन्हा लढावं तर लागणार, या उमेदीने पुन्हा आमचा संघर्ष सुरू आहे,’ अशा आत्मविश्‍वासपूर्ण प्रतिक्रिया लक्षतीर्थ वसाहत येथील जिव्हाळा व प्रिन्स राजाराम कॉलनी येथील पूरग्रस्तांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केल्या.  

गणेश मंडपाचा आसरा मिळाला...
जिव्हाळा कॉलनीत बसगोंडा मल्लाप्पा शिरगावे हे पत्नी, दोन मुलांसमवेत राहतात. शेतमजुरीसह सुरक्षारक्षकाचे काम करून ते उपजीविका करतात. गतवर्षी पुरात घर बुडाले होते. हाताला चिंधीही लागली नाही. हातउसन्यातून एक-एक करत पुन्हा संसार उभा केला. चार दिवसांपूर्वी पुराचे पाणी दारापर्यंत आले, तसे घाबरून गेलो. राहायचं कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला. घरभाडे द्यायला खिशात पैसेही नव्हते. मदतीला गणेशच धावून आला. गल्लीतील उत्सवासाठी उभारलेल्या मंडपाचा आसरा घेतला. घरातील अन्नधान्य, भांडी, कपडे सारे काही मंडपात व शेजारील ट्रॉलीत ठेवले. येथे आमचा संसार सुरू आहे. पाणी ओसरून लागले. आता लवकरच आमच्या घरी जाईन, अशा भावना शिरगावे यांनी व्यक्त केल्या.  

घराची कशीबशी डागडुजी केली...
जिव्हाळा कॉलनीत ऋषीकेश व युवराज पाटील हे दोघे भाऊ आईसोबत राहतात. गतवर्षी पुरात घराची पडझड झाली. सोनारकामाच्या साऱ्या साहित्यासह संसारही वाहून गेला. शासनाची १५ हजारांची मदत मिळाली. पुन्हा हातउसने किरकोळ कर्ज असे ५० ते ६० हजार जमा केले. सोनारकामासाठीचे साहित्य आणले. पुन्हा काम सुरू केले. भांडीकुंडी खरेदी केली. घराची किरकोळ डागडुजी केली; पण कोरोनाच्या संकटाने गिलावा काही करता आला नाही. पाच-सहा दिवसांपूर्वी पुन्हा पुराचे पाणी घराजवळ आले. पण नशीब चांगले म्हणून घरापर्यंत पोचले नाही. पण आम्ही दक्ष आहोत. साऱ्या साहित्याची बांधाबांध करून ठेवली असल्याचे ऋषीकेश व युवराज यांनी सांगितले. 

संसाराला उन्हाळी पदार्थांचा आधार
गेल्या वर्षी नऊ फुटांपर्यंत घरात पाणी होतं. प्रापंचिक साहित्य वाचविण्याची संधीच मिळाली नाही. टीव्ही, मिक्‍सर, टेबल-खुर्च्याच काय; धान्य, चटणीही वाचविता आली नाही. काटकसरीने पुन्हा संसार उभारण्यास सुरवात केली. त्यात कोरोनाचं संकट उभं राहिलं. चांदीकामाच्या व्यवसायातही मंदी आली. दोन मुलांचं शिक्षण, कौटुंबिक खर्च चालविताना पतीची ओढाताण होऊ लागली. सुरवातीला बेकरी पदार्थ करून ते विकत कसेबसे दिवस ढकलले. त्यानंतर उन्हाळी, पापड, सांडगे तयार करून विकण्यास सुरवात केली. पण पुन्हा आता पाऊस सुरू झाला. मंगळवारी तर पुराचे पाणी भिंतीला लागले. रात्रीत साहित्य पहिल्या मजल्यावर ठेवून संसार वाचविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पूर ओसरतोय; पण कोरोनाचं संकट उभे आहेच. पण ही लढाई लढावीच लागणार असल्याचे अर्चना सुनील जाधव यांनी सांगितले. 

हाताला मिळेल ते काम...
प्रिन्स राजाराम कॉलनीतील इरफान रज्जाक सय्यद हे कुटुंबासोबत भाडेकरू म्हणून राहतात. सेंट्रींगचे  काम ते करतात. गतवर्षी पुराचे पाच ते सहा फूट पाणी घरात शिरले. घरातील कसलंच साहित्य बाहेर काढण्याची संधी त्यांना मिळाली नाही. शासनाचे फक्त पाच हजार मिळाले. अद्याप १० हजारांच्या मदतीची अपेक्षाच लागून राहिली आहे. पण सामाजिक घटकांनी मदतीचा हात दिला. हातउसने पैसे घेऊन पुन्हा संसार उभा केला. पण आजही पुराची भीती कायम आहे. कोरोना संकटामुळे परप्रांतीय कामगार आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे हाताला काम मिळाले. सध्या हे कामगार पुन्हा परत आले, तसे हातचे काम पुन्हा गेले. सध्या मिळेल ते काम वडील, भावांबरोबर करत आमचा जीवनसंघर्ष सुरू असल्याचे सय्यद यांनी सांगितले. 

धुण्या-भांड्यातून उभारलं शेड
लक्षतीर्थ वसाहत येथील प्रिन्स राजाराम कॉलनीत छोट्याशा शेडमध्ये बयाबाई बापू कस्तुरे या लहान मुलाबरोबर राहतात. धुणी-भांडी हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन. गतवर्षी कामावरून घरी आल्यानंतर पाहिले, तर पुरात त्यांचे अख्खं घर पाण्यात गेले. पत्रेही वाहून गेले. काहीही शिल्लक राहिले नाही. जवळच एक खोली भाड्याने घेतली. महिन्याभराने पुन्हा घरी आलो. चारघरची कामे करत घराची कशीबशी डागडुजी केली. कोरोनाच्या संकटाने आता फक्त एकाच घरचं काम आहे. त्यात कसेबसे जीवन जगते आहे. पण पुराचा धोका अचानक निर्माण झाला. आता कसं होणार, अशी भीती निर्माण झाली होती. आता दररोजच्या जीवनाची आम्ही लढाई लढत असल्याचे कस्तुरे यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com