कोल्हापूर- मराठा कॉलनी परिसरात "व्हीव्हीआयपी' ; परिसर झाला अतिसंवेदनशील

सदानंद पाटील  
सोमवार, 6 एप्रिल 2020

कसबा बावडा परिसराच्या एक किलोमीटर परिसरात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायाधीश निवासस्थानांसह जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी याच परिसरात रहायला आहेत. त्यामुळेच हा परिसर आता चांगलाच संवेदनशिल बनला आहे.

कोल्हापूर -  मागील दहा दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण असतानाच आज कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे कसबा बावडा परिसराच्या एक किलोमीटर परिसरात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायाधीश निवासस्थानांसह जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी याच परिसरात रहायला आहेत. त्यामुळेच हा परिसर आता चांगलाच संवेदनशिल बनला आहे. या परिसरात आता दररोज सर्व्हेक्षण व औषध फवारणी केली जाणार आहे. 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. रुग्णांवर औषधोपचार करण्यासह खाजगी रुग्णालयातही ही सुविधा निर्माण करणे, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्याची खरेदी करुन त्याचे वितरण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरु आहे. मागील 10 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळेच 14 तारखेला लॉकडाउन संपल्यानंतर संचारबंदीत शिथिलता आणण्याची तयारी केली होती. मात्र एकास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेली आहे. 

मराठा कॉलनी परिसर व्हीव्हीआयपी आहे. गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांचे निवासस्थान आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके हेदेखील याच परिसरात राहतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख आणि पोलीस मुख्यालय देखील मराठा कॉलनीपासून हाकेच्या अंतरावर आहे. मराठा कॉलनीपासून अवघ्या काही मीटरवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचे निवास्थान आहे. त्यांच्या बाजूलाच डीवायएसपी यांचे निवासस्थान आहे. न्यायसंकुल, न्यायाधीशांची निवासस्थाने या परिसरात आहेत. पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानामागेच जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. 

मराठा कॉलनीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याने बावडा पसिर कंटेनमेंट झोन तर बाजूच्या तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून त्या ठिकाणी मोहीम हाती घेतली गेली आहे. यामध्ये वडणगेपासून ते पुलाची शिरोलीपर्यंतचा काही भाग आहे. परिसरातील घरांना भेटी देऊन लोकांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाणार आहे. तसेच दररोज स्वच्छता मोहीम राबवणे व बाधीत व्यक्‍तीशी संबंधित लोकांचा शोध घेण्याचे काम केले जाणार आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Maratha Colony VIP area corona virus