
महाव्यवस्थापक मित्तल ः कोरोनाची स्थिती पाहून अन्य गाड्या सुरू करणार
कोल्हापूर : कोरोनाकाळात बंद केलेली कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूर - सांगलीतून शेतीमाल वाहतुक करण्यास आता सोपी होईल. यामध्ये कोल्डस्टोरेजची व्यवस्थाही होण्याची शक्यता आहे. अशी माहिती मित्तल यांनी व्हर्च्युअल (अाभासी) पत्रकार परिषदेत दिली.
मित्तल म्हणाले, ‘‘कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे सर्वेक्षण करून डीपीआरही केंद्रीय रेल्वे विभागाकडे पाठविला होता, त्याला मंजुरीही मिळाली होती; मात्र निधीअभावी पुढे काम होऊ शकलेले नाही. अशीच अन्य तांत्रिक कामे निधीअभावी अपूर्ण आहेत ती येत्या वर्षभरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
हेही वाचा- Video : देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम
कोरोना लॉकडाउन काळात बंद पडलेली रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने केव्हा सुरू होणार, या प्रश्नावर मित्तल म्हणाले, ‘‘राज्य शासनाशी रेल्वे विभाग समन्वय साधून आहे. आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वेसेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही सुरू केल्या आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुरू करण्यात येईल तसेच कोल्हापूर - वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात सुरू करण्याचा प्रयत्न आहे, याशिवाय दिर्घपल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू करीत आहोत. कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सुचना व कोरोनाची स्थिती विचारात घेऊन गाड्या सुरू करण्यावर आमचा भर आहे.’’
कोल्हापूर - पुणे मार्गाबाबत मार्गदर्शन करु
कोल्हापूर -पुणे नव्या रेल्वे मार्गाबाबत मित्तल म्हणाले की, हा प्रकल्प महारेलच्या अखत्यारीतील आहे, त्या मार्गाबाबत महारेल सोबत काही चर्चा झाल्या आहेत. या मार्गासाठी महारेलने आमच्याकडे तांत्रीक मार्गदर्शन मागविल्यास आम्ही तेही देण्यास तयार आहोत .
कोल्ड स्टोरेज व्यवस्थेची सुविधा
रेल्वेने माल वाहतुक सेवाही सुरू आहे. यात कोल्हापूर - सांगलीतून शेतीमाल वाहतुक होते त्यासाठी कोल्डस्टोरेजची व्यवस्थाही अपेक्षीत आहे मात्र, विभागीयस्तरावर मागणी झाल्यास माल वाहतूक वाढण्याची खात्री असल्यास तशी व्यवस्था करण्याबाबत विचार केला जाईल असेही मित्तल यांनी सांगितले.
संपादन- अर्चना बनगे