वर्षानुवर्ष जपलेली नाती तुटण्याची वेळ: मित्रांत, कुटुंबांत, भावाभावांतही दुरावा

kolhapur municipal corporation candidate Atmosphere
kolhapur municipal corporation candidate Atmosphere

कोल्हापूर :  महापालिका निवडणुकीच्या मांडवाखालून जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात त्यात गैरही नाही; मात्र कालपरवापर्यंत एकमेकांचे चांगले मित्र असलेले आता शत्रू बनत आहेत. मित्रांत दुरावा निर्माण होत असताना काही कुटुंबांतही निवडणूक लढविण्यावरून मतभिन्नता निर्माण झाली आहे.
गेल्यावेळी अमुक एकाने शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे.

कुटुंबांत कलह नको म्हणून मागील निवडणुकीत आम्ही माघार घेतली आता मात्र माघार नाही. त्यामुळे विद्यमान नगरसेवकाने आता थांबावे असाही सूर आहे. वर्षानुवर्षे जपलेली नाती निवडणुकीसाठी तुटण्याची वेळ आली आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी काहींची अवस्था झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांत मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच प्रभागात विकासकामे केली. आता मैत्रीखातर तसेच नात्यात दुरावा नको म्हणून हा प्रभाग दुसऱ्याच्या हाती सोपविताना काहींना जड जात आहे. 


मीच लढणार यावर एखादा ठाम राहिला, तर दुसरा दुखवण्याची संधी अधिक आहे. दोघेही उभे राहायचे म्हटले तर तिसऱ्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे. अनेक प्रभागांत गठ्ठा मतदान असलेल्या भागात उमेदवारांची संख्या एकापेक्षा अधिक कधी होते आणि त्याचा फायदा आपल्याला कसा मिळतो, याची काहीजण वाट पाहत आहेत.


सर्वसाधारण तसेच महिला सर्वसाधारण प्रभागात निवडणुकीच्या आधीच डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग ओबीसीसाठी राखीव झाला असता तर बरे झाले असते, असे काहींना वाटू लागले आहे. काही भागांत विद्यमान नगरसेवकांची अवस्था ‘धरल तर चावतंय आणि सोडले तर पळतंय’ अशी झाली आहे. निवडणुकीची संधी एकदा गेली की ती पुन्हा मिळायची नाही, यासाठी विद्यमानांची मनधरणी सुरू झाली आहे. थांबायचे कोणी, यावर एकमत होत नसल्याने पक्षाचे नेतेच अंतिम निर्णय घेणार आहेत.

बॅकफूटवर जाण्याची काहींना चिंता
निवडणूक आणि निवडून येण्याची एकदा सवय लागली की ती सहजासहजी सुटत नाही, असे म्हटले जाते. विद्यमान नगरसेवक म्हणून जेवढी किंमत असते तितकी निवडणुकीपासून दूर राहिल्यानंतर राहत नाही. त्यामुळे या निवडणुकीत माघार घ्यावी तरी अडचण आणि घेतली तर राजकीयदृष्ट्या आपण बॅकफूटवर जाऊ, याची चिंता काहींना लागून राहिली आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com