Womens Day - video विवाहानंतर सात वर्षांनंतर पायांत चढवले घुंगरू आणि मिळविली पदवी

kolhapur padmashree bagdekar got bharatanatyam degree degree
kolhapur padmashree bagdekar got bharatanatyam degree degree

कोल्हापूर, : वयाच्या ४२ व्या वर्षी पद्मश्री सुरेश बागडेकर यांचे भरतनाट्यममधील पदलालित्य रसिकांच्या काळजाचा वेध घेते. विवाहानंतर तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुन्हा पायांत घुंगरू चढवले. भरतनाट्यममधील ‘विशारद’ पदवीवर त्यांनी समाधान मानले नाही. दोन वर्षांपूर्वी अर्थात वयाच्या चाळिशीत ‘अलंकार’ पदवी मिळवून त्यांनी इतिहास रचला. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली परिसरात ही पदवी मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. सुभाषनगरमधील सामान्य कुटुंबातील पद्मश्री बागडेकर यांचा भरतनाट्यममधला प्रवास थक्क करणारा आहे.

पद्मश्री बागडेकर जवाहरनगर हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाल्या. तात्यासाहेब तेंडुलकर महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिकल्यानंतर कमला महाविद्यालयातून त्यांनी समाजशास्त्र विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. वडील सुरेश बागडेकर यांना नृत्याची आवड होती. त्यांनी पद्मश्री यांना नृत्यांगना होण्यासाठी प्रोत्साहित केले. दक्षिण भारतातील तंजावरच्या भेटीत नटराजाची मूर्ती त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. महाद्वार रोडवरील बद्रीनाथ कुलकर्णी यांच्या भरतनाट्यमच्या क्‍लासमध्ये त्यांनी सहावीला असताना प्रवेश घेतला. सात वर्षांच्या अथक परिश्रमाने त्यांनी विशारद पदवी मिळवली. एकविसाव्या वर्षी झालेल्या विवाहानंतर त्यांच्या भरतनाट्यमला २००१ ते २००७ दरम्यान ब्रेक लागला. त्या पुन्हा भरतनाट्यमकडे वळल्या. भरतनाट्यममधील गुरु मोहिनी दिवाण त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पुढे पद्मश्री शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात भरतनाट्यम मानद शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. मुलगा नीलला पाठीवर घेऊनच त्या विद्यापीठात यायच्या. विद्यार्थिनींना भरतनाट्यमचे धडे देताना अलंकार पदवी मिळविण्याची अस्वस्थता त्यांच्यात होती. संस्कृतमधील शब्दांचा भरतनाट्यममधील वाढलेला वापर त्यांच्यासाठी अडचणीचा होता. शालेय जीवनात तो विषयही अभ्यासक्रमात नव्हता. 
संस्कृत भाषा डोक्‍यात घेत त्यांनी २०१६ ला अलंकारच्या पहिल्या परीक्षेत बाजी मारली. दुसऱ्या परीक्षेने दगा दिल्यानंतर त्यांनी हिंमत हरली नाही. पुन्हा जोमाने तयारी करत त्यांनी पदवी मिळवलीच. एम. ए. ची पदव्युत्तर पदवी त्यांना मिळवायची होती. टिळक विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला आहे. एम. ए. च्या द्वितीय वर्षात त्या शिकत आहेत. पाचगाव, आर. के. नगर, सुभाषनगरमध्ये त्यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण देण्यासाठी क्‍लास सुरू केला होता. 

मुलांच्या शिक्षणात कसूर नाही 
त्यांची सर्व मुले शिकावीत, ही इच्छा होती. मुलगा मनोज, संजय, मुलगी जयश्री, विजयश्री व पद्मश्री यांच्या शिक्षणात त्यांनी कसूर केली नाही.


पाचवीच्या वर्गात गेल्यावर पायात पहिल्यांदा चप्पल घातली. इस्त्री करण्यासाठी पैसे नसायचे. तांब्यात विस्तव घालून गणवेशाला इस्त्री करायचे. एकच गणवेश असायचा. तोच धुवून पुन्हा वापरत होतो. आज परिस्थिती बदलली आहे. माझे पती तलाठी आहेत. ते मला नेहमीच प्रोत्साहन देतात. माझ्या गुरु मोहिनी दिवाण यांनी मला दिलेली साथ मी विसरू शकत नाही.
- पद्मश्री बागडेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com