कोल्हापुरातील क्वारंनटाईन सेंटर पुन्हा 'फुल्ल' ; पुढची तयारी 'ही'...

Kolhapur quarantine center full again
Kolhapur quarantine center full again

कोल्हापूर - शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच संपर्कात आलेल्यांची संख्या पाहता महापालिकेला हॉटेलचा क्वारंनटाईन सेंटर म्हणून ताबा घ्यावा लागेल असे सध्याचे चित्र आहे. विविध भागातील क्वारंनटाईन सेंटरमध्ये सध्या सुमारे साडेअकराशे नागरिक क्वारंनटाईन असून येत्या काही दिवसात ही जागाही कमी पडेल अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.
शहरातील रुग्णसंख्या हजारावर गेली आहे. संपर्कात कुटुंबातील सदस्य तसेच अन्य लोक येत असल्याने त्यांना सक्तीने क्वारंनटाईन करावे लागत आहे. मध्यंतरी ज्यांना लक्षणे दिसतील अशांचेच स्वॅब घेतले जात होते. तशी लक्षणे नसल्यास होम क्वारंनटाईनचा शिक्का मारून त्यांना घरी पाठविले जात होते. आता मात्र समूह संसर्गाचा धोका असल्याने जे जे रुग्णाच्या संपर्कात आले त्यांचा स्वॅब घ्यावा लागत आहे. अहवाल पॉझिटीव्ह आल्यास संबंधिताला सीपीआरला हलविले जाते. रुग्ण एक असला तरी क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरात सध्या वीस ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहेत. तेथे खाण्यापिण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे.

मध्यंतरी पुण्या-मुंबईहून लोक आल्यानंतर क्वारंनटाईन सेंटरमध्ये गर्दी झाली. नंतर रुग्णसंख्या थोडी कमी होत गेली मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून शहर परिसरात रुग्ण आढळून येऊ लागले. 14 दिवसांत कधीही कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यास तातडीने उपचार करता यावेत यासाठी क्वारंनटाईनची व्यवस्था आहे.

मध्यंतरी प्रशासनाने हॉटेल, लॉन, तसेच मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा विचार केला होता. सध्या हॉटेलला परवानगी दिली तरी 67 टक्के भाग हा क्वारंनटाईनसाठी राखून ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. पेड क्वारंनटाईन प्रत्येकाला परवडते असे नाही. एका दिवसाचे भाडे किमान हजाराच्या घरात आहे. अशा स्थितीत महापालिकेची क्वारंनटाईन सेंटर आधार ठरली. तुर्तास रुग्णांची वाढती संख्या पाहता हॉटेल ती मोफत स्वरूपात उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.

कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांची वाढती संख्या पाहता हॉटेल ताब्यात घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत. तेथे मोफत व्यवस्था करण्याची तयारी आहे. क्वारंनटाईन सेंटरमध्ये अजूनही आठशे जागा राखीव आहेत. वाढती संख्या पाहता ते ही अपुरे ठरतील असे चित्र आहे.
- निखिल मोरे, उपायुक्त, महापालिका  

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com