कोल्हापूर शहरवासियांना पुन्हा महापूराची धास्ती

 Kolhapur residents fear floods again
Kolhapur residents fear floods again

कोल्हापूर ः शहरात बुधवारी (ता.5) धुवॉंधार पाऊस झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पावसाने शहर परिसरात आज दिवसभर उसंत घेतली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र पावसाला जोर ओसरला होता. पाणी आलेल्या भागात अजूनही भीतीचे वातावरण आहे. धरणातून विसर्ग सुरू आहे. पुन्हा शहरातील कांही भागात पाणी शिरण्याची शक्‍यता असल्याने संभाव पूर येणाऱ्या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देत स्थलांतरित होण्याचे किंवा निवारा केंद्रात आसरा घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील सुतारवाडा परिसरातील 20 कुटुंबाचे स्थलांतर चित्रदुर्ग मठात करण्यात आले. 

बुधवारी पावसामुळे शहराच्या विविघ भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. ओढ्याकाठावरील घरात पाणी घुसल्याने ताराबळ उडाली. देवकर पाणंद, जगतापनगर (जरगनगर) बसंत बहार रोड, कारंडे मळा, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटीलवाडा, परीख पूल, शाहूपुरी, कुंभार गल्ली या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले. उपनगरात पाण्याचे लोट वाहून आले. अनेक घरात पाणी शिरले. काल रात्रीही पावसाने दमदार हजेरी लावली. आज पाऊस नेमके काय करतो, याकडे लक्ष लागून राहिले होते; मात्र सकाळीच चक्क सूर्यदर्शन घडल्याने अनेकांना दिलासा मिळाला. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. भाजीपाला विक्रीच्या निमित्ताने ग्रामीण भागातून जे लोक येतात. ते ही काल येऊ शकले नाहीत. आज सकाळपासूनच बाजारपेठेतील लगबग सुरू झाली. मंडई, व्यापारी पेठा गर्दीने फुलून गेल्या. रस्त्यावरही दुचाकी तसेच चारचाकी वाहने मोठ्या संख्येने नजरेस पडले. 
शाहूपुरी कुंभार गल्लीतील कुंभार बांधवांनी गेल्या महापुराचा अनुभव पाहता या वर्षी दक्षता घेतली आहे. जयंती नाल्याच्या बाजूला असलेल्या गल्लीत बुधवारीच पाणी आले होते. आज या भागातील पाणी थोडे कमी झाले. असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर या भागातील पाणी कमी झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल रात्री शाहूपुरी कुंभार गल्लीसह पुराचे पाणी येऊ शकणाऱ्या भागात पाहणी करून माहिती घेतली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी धोक्‍याकडे निघाल्याने सुतारमळा येथील काही नागरिकांचे आज स्थलांतर करण्यात आले. 
पावसाचा जोर कमी झाला तरी पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने शहर परिसरात धास्ती कायम आहे. गेल्या वर्षी याच आठवड्यात शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, खानविलकर पेट्रोल पंप ते उलपे मळा, बापट कॅम्प येथे महापुराचे पाणी घुसले होते. लक्ष्मीपुरीतील प्रार्थना हॉटेलपर्यंत पाणी येण्याची पहिलीच वेळ होती. पंचगंगा तालीम रस्त्यावर जनवाडकर कॉम्पलेक्‍स पर्यंत पहिल्यांदाच पाणी आले. 
वर्षानंतर आजच्या दिवशी गेल्या वर्षीसारखी स्थिती नसली तरी अनुभव पाठीशी असल्याने महापुराची स्थिती निर्माण होऊ नये अशीच अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत. 


धोकादायक घरे, इमारतींचा माहिती येथे द्या 
शहरात एखादी आपत्ती, इमारत अथवा इमारतीचा काही भाग कोसळल्यास त्याची माहिती महानगरपालिका विभागीय कार्यालयातील दक्षता विभागास पुढील क्रमांकावर द्यावी. गांधी मैदान, विभागीय कार्यालय- दूरध्वनी - 2622262 व 2620270, शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय - दूरध्वनी -2543844 व 2543088, राजारामपुरी विभागीय कार्यालय - दूरध्वनी - 2521615 व 2530012, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्र. 4 - दूरध्वनी क्र. 2536726 व 2530011 संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे

संपादन ः यशवत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com