
अरुंद रस्ता, अस्ताव्यस्त पार्किंग आणि छोट्या मोठ्या अतिक्रमणामुळे ट्रॅक्टर चालक वेडीवाकडी वळणे घेत वाहन चालवत होता
नागाव (कोल्हापूर) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून डॉक्टर युवती ठार झाली. राजलक्ष्मी सयाजीराव जाधव- पाटील ( वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले ) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.
वडील सयाजीराव चिमासाहेब जाधव-पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यासाठी त्या वडिलांसोबत दुचाकीवरून कोल्हापूरला खासगी रुग्णालयात निघाल्या होत्या. शिये-कसबा बावडा राज्य मार्गावर रामनगर, शिये येथे दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सयाजीराव यांच्यावर हृदयविकार संबंधित वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते सावर्डे ते कोल्हापूर हा प्रवास दुचाकीने करतात. उपचारासाठी जात असताना राजलक्ष्मी त्यांच्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या. शिये - कसबा बावडा राज्य मार्गावर रामनगर, शिये येथे ऊसाने भरलेल्या दोन ट्राॅली घेऊन राजाराम साखर कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर सयाजीराव यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करत होता. अरुंद रस्ता, अस्ताव्यस्त पार्किंग आणि छोट्या मोठ्या अतिक्रमणामुळे ट्रॅक्टर चालक वेडीवाकडी वळणे घेत वाहन चालवत होता. यामुळे सयाजीराव यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरली आणि राजलक्ष्मी रस्त्यावर पडल्या. त्याच क्षणी ऊसाने भरलेल्या ट्राॅलीचे चाक त्यांच्या अंगावर येऊन धडकले आणि त्यांना काही अंतर तसेच फरफटत नेले. प्रवाशांनी आरडाओरड करून ट्रॅक्टर चालकास थांबवले. तोपर्यंत राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला होता.
हे पण वाचा - गृहराज्यमंत्र्यांनी मारला झणझणीत मिसळीवर ताव
राजलक्ष्मी या गडहिंग्लज वैद्यकीय महाविद्यालयातून बीएचएमएस झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वैद्यकीय परीक्षेचा अंतीम वर्षाचा निकाल कालच लागला आहे. आज वडिलांच्या उपचाराची माहिती घेऊन त्या आपले निकालपत्र आणण्यासाठी जाणार होत्या. त्यांची लहान बहिण त्याच महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत आहे. तर वडील सयाजीराव चिमासाहेब जाधव पाटील हे सावर्डे येथील शाळेत लिपिक आहेत.
अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
हे पण वाचा - आपण आता अमित शहांची कॉलर धरू ; राजू शेट्टींचा खणखणीत इशारा
संपादन - धनाजी सुर्वे