का होते मुलींची छेडछाड : वाचा सकाळचा स्पेशल रिपोर्ट ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ladies harassment sakal special report taj kolhapur marathi news

रिपोर्ताजमध्ये तरुणींनी त्यांना रोज सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनपेक्षित, मान खाली घालायला लावणाऱ्या प्रसंगांची नावे न छापण्याच्या अटीवर कैफियतच मांडली.

का होते मुलींची छेडछाड : वाचा सकाळचा स्पेशल रिपोर्ट ताज

कोल्हापूर : तरुणींची छेडछाड, त्यांची सुरक्षितता हा नेहमीच गंभीर विषय असतो. शहरातील तरुणींची छेडछाड होते किंवा नाही, त्यांना याचा नेमका कशा पद्धतीने त्रास होतो, पोलिसांत तक्रार दिली तर काय होईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक छळ कसा केला जातो, अशा प्रश्‍नांवर पाच महाविद्यालयांतील सुमारे 350 हून अधिक तरुणींशी संवाद साधला.

या संवादातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. समाजातील छेडछाडीचा विकृतपणा पुढे आला. छेडछाड होऊनही अनेक तरुणी कुटुंबाशी संवाद साधू शकत नाहीत किंवा पोलिसांत तक्रारही देऊ शकत नाहीत. "निर्भया' पथकसारखे उपक्रम राबवून पोलिस यंत्रणा यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु अनेक वेळा तक्रारीच न आल्यामुळे कारवाई करण्यावर मर्यादा येते. 

हे वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही;! -

डिजिटल छेडछाडीवर प्रकाश

आज केलेल्या रिपोर्ताजमध्ये तरुणींनी त्यांना रोज सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अनपेक्षित, मान खाली घालायला लावणाऱ्या प्रसंगांची नावे न छापण्याच्या अटीवर कैफियतच मांडली. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक अशा सोशल मीडियावरून होणाऱ्या "डिजिटल छेडछाडी'वरही प्रकाश टाकला. छेडछाडीच्या प्रसंगांचे कथन केले. काही वेळा छेड काढणारा राजकीय वजनदार व्यक्तीशी संबंधित असल्याने गप्प बसावे लागते, कारण आवाज ऐकणारे कोणी नसते. तरुणींनी या छेडछाडीविरुद्ध "दामिनी' म्हणजेच वीज बनण्याची वेळ आली आहे. वीज बनून छेडछाड करणाऱ्याविरुद्ध तुटून पडा. निर्भयपणे बोलले पाहिजे, तक्रार केली पाहिजे, तरच या छेडछाडीला लगाम बसू शकेल. 

हेही वाचा- चोरट्यांची हद्द; ओपन जिमच्या साहित्याची चोरी

घटना क्रमांक 1 
महाविद्यालयातील अभ्यासिकेत जाण्यासाठी नोंदवहीत नाव आणि मोबाईल क्रमांक नोंद केला. तिच्या पाळतीवर असणारा तरुण पाठलाग करत आला. तिने नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकाचा फोटो त्याने मोबाईलवर काढला. त्याच रात्री त्याने तिला व्हॉटस्‌ ऍपवर "हाय' असा संदेश पाठवला. इतरांप्रमाणे अनोळखी म्हणून यालाही तिने "इग्नोर' केले. पाठोपाठ संदेश पडत गेले. त्यात "हाय'वरून फ्रेंडशिप ते "लव्हशिप'पर्यंत तो पोहचला. तिने त्याला तातडीने व्हॉटस्‌ ऍपवर ब्लॉक केले. त्याच रात्री त्याने पुन्हा फोन केला. उचलला नाही, म्हणून त्याने पुन्हा नव्या नंबरवरून तिला पुन्हा तसेच संदेश पाठविले. तिने पुन्हा त्याला ब्लॉक करून भावाला याची माहिती दिली. त्याने थेट मोबाईल सिमकार्डच बदलले. असाच प्रकार तिच्या वर्गमैत्रिणींबाबतीतही घडला. जीमच्या नोंदवहीवरून मोबाईल क्रमांक घेतला आणि त्रास सुरू झाला. 

हेही वाचा- याला मैदान म्हणायचे का?

घटना क्रमांक 2 
लहान बहिणीला न्यू महाद्वार रोड येथील एका शाळेतून आणण्यासाठी मोपेडवरून ती गेली. ती पार्किंगमध्येच उभी होती. अचानक एक तरुणांचा घोळका येऊन उभा राहिला. "आली रे ती आली', असे म्हणत ते एकमेकाला इशारा करू लागले. समोरून काही मुली येत होत्या. त्यातील एक मुलगी तिच्या मोपेडपासून काही अंतरावर होती. टवाळखोरांनी तिला एकदम गराडाच घातला. त्यातील एका तरुणाने तिच्या हातात जबरदस्तीने चिठ्ठी कोंबली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने ती घाबरली. मैत्रिणींना सोबतीला घेऊन ती तेथून निघून गेली. पण टवाळखोर अश्‍लील शेरेबाजी करत, गाणी म्हणत तिच्या पाठीमागून गेले. भर रस्त्यावर घडलेला हा प्रकार पालकांसह रस्त्यावरील नागरिक पाहत होते; पण त्यांना रोखण्याचे धाडस कोणीच केले नाही. हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहिले. त्यामुळे तिला तिच्या लहान बहिणीची काळजी वाटू लागली आहे. 

हेही वाचा- स्थायी सभापतीपदासाठी कवाळे, खाडे यांचे अर्ज

घटना क्रमांक 3 
प्राथमिक शाळेत असताना घराशेजारीच राहणाऱ्या बालमित्राशी ती खेळायची. जसजशी मोठी झाली, तशी ती अलिप्त राहू लागली. त्याने बसथांब्यापर्यंत तिचा पाठलाग सुरू केला. त्याच्याकडे सुरवातीला दुर्लक्ष केले; पण त्याचा त्रास सुरूच होता. एकदा डेरिंग करून तिने त्याला "तू माझ्याकडे का बघतोस?' असा प्रश्‍न केला. त्यावर त्याने "तुला कसे समजले मी तुझ्याकडे बघतोय? म्हणजे तूच माझ्याकडे नेहमी बघतेस,' अशी शेरेबाजी केली. तसे त्याच्या मित्रांनी कुत्सितपणे हसून तिला हिणवलं. त्याचा रोजचा त्रास कमी होईना. एक दिवस जवळच्या पोलिस ठाण्यातील मॅडमकडे तिने त्याची तक्रार केली. त्याच्यासह त्याच्या मित्रांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले. त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच दिवशी काही तासांनंतर तो पोलिस ठाण्यातून बाहेर आला. त्याच्या मोठ्या भावाने घरच्यांशी या विषयावर चर्चा केली. तो विषय घरच्यांना समजला. तिला वाटलं, आता तरी त्याच्यात सुधारणा होईल. मात्र, उलट तो आणि त्याचे मित्र "तुम्ही कितीही तक्रारी द्या, आम्ही दोन तासांनंतर बाहेर येणार,' असे वारंवार बोलून दाखवू लागले. घरच्यांनीही गल्लीतच राहतो, वाईटपणा नको, थोडं दुर्लक्ष कर, असा सल्ला तिला दिला. पण आजही कॉलेजला येताना बस थांब्यापर्यंत तो तिच्याभोवती घिरट्या घालण्याचा प्रकार अधूनमधून करत असतोच. 

हेही वाचा- शिक्षण मराठीत, प्रश्‍न पत्रिका हिंदी, इंग्रजीत

अश्‍लील हावभाव... नको ते स्पर्श 
शहरातील अनेक महाविद्यालयांत ग्रामीण भागातून विद्यार्थिनी येतात. त्या एसटीने प्रवास करतात. रोजच्या प्रवासात छेडछाडीचे प्रसंग अनुभवायला येत असल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. एसटीमध्ये काही व्यक्ती रोज दारू प्यायलेल्या असतात. कितीही रिकामी जागा असली तरी मुलींच्याच शेजारी येऊन बसतात. अश्‍लील हावभाव करतात, काही ना काही कारणाने स्पर्श करतात. वाहकाला हा प्रकार सांगितला, की वाहक आपली सीट या मुलीला देतो. मात्र, हा प्रकार रोजच घडत असल्याचे मुलींनी सांगितले. 

छेडछाड होण्याची ठिकाणे 
1. शाळा, महाविद्यालय परिसर 
2. महाविद्यालयाचे पार्किंग 
3. बस प्रवासात 
4. खचाखच भरलेले वडाप 
5. बस स्टॅंड, एसटी स्टॅंड 
6. रंकाळा चौपाटी 

छेडछाडीचे प्रकार... 
1. शाळा, महाविद्यालयाच्या दारात अश्‍लील शेरेबाजी 
2. मोटारसायकलवरून पाठलाग 
3. बससह वडापमध्ये बॅड टच 
4. जबरदस्तीने चिठ्ठी देणे 
5. मोबाईल क्रमांक मोठ्याने सांगणे 
6. फोन करण्याविषयी खुणावणे 
7. रस्त्यात जबरदस्तीने अडविणे 
8. मोपेडवर गुलाब फुले ठेवणे 

डिजिटल छेडछाड 
1. मोबाईल क्रमांक मिळवून कॉल करणे 
2. अनोळखी क्रमांकावरून संदेश, व्हिडिओ पाठविणे 
3. फेसबुकवर थेट अश्‍लील संदेश पाठविणे 
4. फेसबुकवर फेक अकाउंटद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणे 
5. नंबर ब्लॉक झाल्यास नवीन क्रमांकावरून संदेश पाठविणे 

तक्रार करण्याची धास्ती 
1. घरच्यांना सांगितले तर पुढील शिक्षण बंद होईल 
2. घरची मंडळी हाणामारी करतील, अविश्‍वास दाखवतील 
3. घरच्यांसह शिक्षकांच्या नजरेतून उतरण्याची भीती 
4. संबंधित शेजारीच असेल तर टोकाचे वाद होण्याची शक्‍यता 
5. बदनामी होण्याची भीती 
6. तक्रारपेटीचा आधार घेताना इतरांच्या नजरेत येण्याची धास्ती 
7. पोलिसांत गेल्यानंतर पालकांपर्यंत ही गोष्ट जाण्याची भीती 

व्हॉट्‌स ऍप (क्रमांक) 9146190191 

व्यक्त व्हा... 
तरुणींची छेडछाड किंवा त्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत असताना अनेक जण बघत बसतात. महाविद्यालय, शाळा, कामाच्या ठिकाणी असे होणाऱ्या छळाविषयी माहिती पाठवा. या प्रकाराला वाचा फोडण्याचे काम "सकाळ' करेल. यामध्ये तुमची सगळी माहिती गोपनीय ठेवली जाईल. पोलिसांच्या मदतीने न्याय देण्यासाठी पावले उचलली जातील, याकडे लक्ष ठेवले जाईल. 

महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे.

छेडछाडीबाबत विद्यार्थिनींसह महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. टोल फ्री क्रमांक 100, 1091 चा वापर करावा. तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून तातडीने निर्भया पथक व स्थानिक पोलिसांकडून कारवाई केली जाईल. 
- प्रेरणा कट्टे, शहर पोलिस उपअधीक्षक 

Web Title: Ladies Harassment Sakal Special Report Taj Kolhapur Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur