सावधान : जमीन खरेदी करताय; एकच जमीन दोनदा विकण्याचे घडतायेत प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

जमीन, प्लॉट घेताना अलीकडील कागदपत्रांच्या पडताळणीची गरज

बालिंगा (कोल्हापूर)  : शहर परिसरातील आठ ते दहा किलोमीटर परिसरात किंवा उपनगरात एकाच जमिनीचा प्लॉट दोन किंवा अनेक वेळा विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले. जमीन किंवा प्लॉट देतो म्हणून पैसे घेऊन, चुकीचा प्लॉट दाखवून जमिनीची विक्री केली जात असल्याचे प्रकार सध्या उजेडात येत आहेत. जमीन, प्लॉट घेताना अलीकडील कागदपत्रांच्या पडताळणीची गरज आहे. 

कोल्हापूर शहरात फ्लॅट आणि प्लॉटचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शहराच्या जवळच उपनगरात निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या पाडळी खुर्द, बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, पाचगाव, गिरगाव, रिंगरोड परिसर, पुईखडी येथील जमिनींना प्राधान्य दिले जात आहे. 

याच उपनगरात किंवा गावात जमिनी किंवा प्लॉट घेण्यासाठी लोकांचा ओघ आहे. या ठिकाणच्या मूळ मालकांकडून मध्यस्त किंवा एजंटाकडून जमीन खरेदी केल्या जात आहेत. ग्राहकांना हीच जमीन किंवा प्लॉट देताना काही पैसे रोख स्वरूपात घेतले जातात. त्यांच संचकारही होते; पण कालांतराने विक्री करणाऱ्यांकडून व्यवहार मोडला जातो आणि त्याचे पैसे घेणाऱ्या व्यक्तीला परत दिले जात नाहीत. याउलट अशा काही जमिनींचा सर्व रक्कम देऊनही ग्राहकाला जमिनी खरेदी दिली जात नाही. आठ ते दहा वर्षापासून अशी प्रकरणे प्रलंबित आहे.

अनेकांनी जमिनी इतर शेतकऱ्यांना विक्री केली आहेत. त्याचा योग्य मोबदलाही घेतला आहे. पैसे घेतलेले कागदपत्रही केले आहे. पण, प्रत्यक्ष जमीन खरेदी करून दिलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी घेणाऱ्यांच्या ताब्यात आणि सातबारा मालकाच्या नावावर अशी परिस्थिती आहे. यामध्ये इतर ग्राहकांची मोठी फसवणूक केली जात आहे. कर्ज किंवा इतर तडजोड करून खरेदी केलेली जमीन किंवा प्रॉपर्टी कायद्याच्या कचाट्यात अडकून पडण्याचा धोका वाढला आहे. 

हेही वाचा- दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस इचलकरंजी दाखल

जमीन खरेदी करताना अशी घ्या दक्षता
 सातबारावरील वारसांची सहमती आहे का?  सातबारावर कुळ किंवा पीक पाहणीला अन्य कोणाची नावे आहेत का?  यापूर्वी कोणाला संचकारपत्र, साठेखत करून मूळ मालकाने पैसे घेतले आहेत का?  शेतजमीन किंवा प्लॉट कोणाच्या ताब्यात आहे?

 

बालिंगा-पाडळी खुर्द हद्दीतील जमिनी काही शेतकऱ्यांनीच घेतल्या होत्या. त्याचे पैसे दिलेली कागदोपत्री नोंद आहे. तरीही मूळ मालक किंवा काही लोक याच जमिनी इतरांना विक्री करण्याचा घाट घालत आहेत. अशा लोकांपासून ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे.  
- शिवाजी साळवी, फुलेवाडी रिंगरोड

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land plot fraud call crime case