ऐतिहासिक भवानी मंडपात प्रतिकात्मक दसरा सोहळा ; श्री अंबाबाईची रथारूढ रूपात सालंकृत पूजा

संभाजी गंडमाळे
Sunday, 25 October 2020

परंपरेप्रमाणे सिध्दार्थनगरमार्गे पंचगंगा घाटावर विविध धार्मिक विधी होवून पालखी पुन्हा मंदिरात आली.

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा सोहळा येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा झाला.

सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटले गेले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली. यानिमित्ताने मंगलवाद्यांच्या निनादाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. 

हेही वाचा - प्राचीन काळापासून जोतिबा डोंगरावर सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडीत -

खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची रथारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजामार्गे फुलांनी सजवलेल्या वाहनातून भवानी मंडपात आली. तुळजाभवानी मंदिरात पालखी विराजमान होताच छत्रपती परिवाराचे आगमन झाले. त्यानंतर मंत्रोच्चार आणि आरती होवून शमीपूजनाचा सोहळा सजला.

सोहळ्यानंतर छत्रपती परिवाराने श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. याचवेळी श्री अंबाबाईची पालखी मंदिरातून बाहेर पडली. परंपरेप्रमाणे सिध्दार्थनगरमार्गे पंचगंगा घाटावर विविध धार्मिक विधी होवून पालखी पुन्हा मंदिरात आली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पालखी रवाना झाली. मात्र, मार्गावर दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

हेही वाचा -  मराठा आरक्षण समतेचा लढा ; लोकप्रतिनिधीनी एकत्र यावे -

दसरा चौकात शुकशुकाट

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा आणि त्याचा थाट काही औरच असतो. प्रत्येक वर्षी यानिमित्ताने दसरा चौकात हजारो कोल्हापूरकर एकवटतात. मात्र, यंदा हा सोहळा रद्द झाल्याने या साऱ्या परिसरात शुकशुकाट राहिला.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last day of navratri dashehera festival celebrated on bhavani mandap in kolhapur