लॉकडाउन आहे. पण, सावकार थांबायला तयार नाही 

the lender is not ready to stop
the lender is not ready to stop

गडहिंग्लज : माणूस आर्थिकदृष्ट्या हतबल झाला की तो बॅंकांची पायरी चढतो. तेथेही त्याला उभे करून घेतले नाही तर मग त्याच्यासमोर सावकार हा एकमेव पर्याय उरतो. कितीही व्याज असले तरी गरज म्हणून माणूस सावकाराचे दार ठोठावतो. या कर्जाच्या परतफेडीसाठी तो धडपडत असतो.

सावकारी व्याज भरूनच तो मेटाकुटीला येतो. तीन महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्याने लॉकडाउन आहे. परंतु, सावकार थांबायला तयार नाहीत. त्याच्या वसुलीच्या दंडुक्‍याने कर्जदारांच्या चिंतेत भर पडते. एकीकडे लॉकडाउनमुळे उत्पन्न थांबले आणि दुसऱ्या बाजूला सावकारीचा फास अशा दुहेरी कचाट्यात संबंधित अडकल्याचे चित्र आहे. 

चार दिवसांपूर्वी गडहिंग्लजशेजारच्या एका गावात कर्जाला कंटाळून आत्महत्या झाली. फायनान्स कंपन्या व "इतर' कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद झाली. परंतु, "इतर' या शब्दातच सावकारी कर्जाचा फास दडल्याची चर्चा आहे. आत्महत्या केलेल्याने काही सावकारांकडूनही कर्ज घेतल्याचे सांगण्यात येते. मुलाला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबईतील कोणाला तरी त्याने पैसे दिल्याचे बोलले जाते. मात्र, हे पैसेही नाहीत आणि नोकरीही नाही अशा दुहेरी कात्रीत तो अडकला होता, अशीही चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे. 

मुळात व्यवसायाने गवंडी असलेल्या या व्यक्तीचा रोजगार लॉकडाउनमुळे थांबला होता. हातात पैसे नव्हते. परंतु, दुसऱ्या बाजूला "इतर' ठिकाणाहून घेतलेल्या कर्जाची वसुली थांबत नव्हती. या "इतर' प्रकारातून कर्ज देणाऱ्याने गवंड्याचा दरवाजा अनेकदा ठोठावला होता म्हणे. सात लाखांहून अधिकचे कर्ज आणि त्याचे व्याज देणेही मुश्‍किल झालेल्या गवंड्याने अखेर कंटाळून स्वत:लाच फास लावून घेतल्याची चर्चा आहे. 

हे एक प्रातिनिधीक उदाहरण असले तरी अलीकडे सावकारी पाशाला कंटाळून अनेकांनी आयुष्य संपविल्याचे बोलले जाते. पोलिसांत नोंद होताना मात्र कारण दुसरेच असते. यापूर्वी गडहिंग्लज पोलिसांत सावकारीचे गुन्हे दाखल झाले. दंडुकशाहीने कर्जाची वसुली करणाऱ्या सावकाराला कायद्याचा धाक अजूनही बसलेला दिसत नाही. मध्यंतरी कर्जाच्या बदल्यात प्लॉटच लिहून घेतल्याचा प्रकार घडला. एकाच्या घरात शेकडो कोरे धनादेश आढळले. अशाच वसुलीच्या तगाद्याने एकाने आपले आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हे प्रकरण पोलिसांपर्यंत आले नाही. सोन्याच्या बदल्यात कर्ज दिलेल्या सावकाराने पैसे देऊनही सोने देत नव्हता. तोही गुन्हा पोलिसांत आहे. असे एक ना अनेक प्रकरणे पुढे येत असले तरी सावकारी थांबायला तयार नाही. माणसाची गरज पाहून त्याला नडविले जाते. व्याज भरूनच तो हतबल झालेला असतो. मुद्दलापेक्षा व्याजच कितीतरी पटीने भरावे लागते. बॅंकांनी हप्ते भरण्यास मुदतवाढ दिली असली तरी सावकारीचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो. पाच ते दहा टक्के व्याजदराने सावकारी वसुली होत असल्याची चर्चा तालुक्‍यात जोरदार सुरू आहे. 

पोलिस धाडस करणार काय? 
अलिकडे तीन महिने कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगारावर पाणी फिरले आहे. त्यातच सावकारी वसुलीने हे लोक मानसिकदृष्ट्या खचत आहेत. हा प्रकार सहन करण्याची ताकद असणारा जगत आहे, परंतु ते सहन करू न शकणारा आपले जीवन संपवत आहे. अशा प्रकरणात पोलिसांचा योग्य तपास झाला तर अनेकांचे बेकायदा सावकारीचे धंदे उघडे पडणार आहेत. ते धाडस पोलिस करणार काय, हा प्रश्‍न आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com