सहकार आयुक्तालयाचे साखर कारखान्यांना पत्र; कोरोना पार्श्वभूमिवर काळजी घेण्याच्या सूचना 

शामराव गावडे
Thursday, 24 September 2020

मागील गळीत हंगामाच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. त्यावेळी तोडणी यंत्रणा आपापल्या गावाकडे परतली होती

नवेखेड (जि. सांगली) : यंदा राज्यातील गाळप हंगामाला १५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत गाळप हंगामासाठी ऑनलाईन अर्ज करावा असे पत्र सहकार आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना पाठवले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व कारखान्यांना पंचवीस बेडचे तात्पुरते हॉस्पिटल तयार करून  त्या ठिकाणी डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची व तोडणी मजुरांची सोय करावी अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. 

मागील गळीत हंगामाच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. त्यावेळी तोडणी यंत्रणा आपापल्या गावाकडे परतली होती. त्या वेळेत ऊस तोडणी करताना कारखान्यांची मोठी दमछाक झाली होती.

यंदाही कोरोना आहेच. त्यामुळे २५  बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.  यंदा तीन लाख तोडणी कामगार येतील असा अंदाज आहे. तोडणी मजुरांनी तोडणीसाठी येताना ५० वर्षावरील व्यक्तीस आणू नये, अशा सूचना साखर आयुक्तालयाने कारखानदारांना दिल्या आहेत. यंदा सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्राला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक कारखान्याने पाच ते दहा तोडणी यंत्र भाडोत्री पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. तोडणी यंत्रावर भर राहणार असल्याने राज्यातील कारखान्यांनी तोडणी यंत्रांची मागणी केली आहे. तोडणी यंत्र उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. राज्यातील २० ते २२ कारखान्यांनी गाळपासाठी आज अर्ज केले आहेत. इतर कारखान्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत

आगामी काळात हंगामाची स्थिती

गाळपासाठी तयार असणारे कारखाने १९०
ऊस तोडणीसाठी येणारे तोडणी मजूर तीन लाख
 ऊस तोडणी यंत्र मागणी ५०० गाळपासाठी अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर

हे पण वाचाVideo - मनसेकडून कोल्हापूर महापालिकेच्या कारभाराची घोडे, हलगी आणि बॅंडच्या तालावर वरात 

 

राजाराम बापू कारखान्याने यंदाच्या गाळप हंगाम परवान्यासाठी अर्ज केला आहे. मजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी करखाण्यामार्फत नियोजन केले आहे.

-आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक राजाराम बापू साखर कारखाना.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter of Commissioner of Co operation to Sugar Factories