इचलकरंजीसह परिसर आजपासून पुन्हा लॉक ; असे आहेत नियम 

Lockdown in Ichalkaranji kolhapur
Lockdown in Ichalkaranji kolhapur

कोल्हापूर - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे इचलकरंजी पालिका क्षेत्र, शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी या क्षेत्रामध्ये ४ ते १३ जुलै रात्री बारादरम्यान एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात आणि एका गावातून दुसऱ्या गावातही कारणाशिवाय जाण्यास बंदी आहे. भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तू विक्रीला यातून वगळले आहे. पन्नास टक्के व्यक्तींवरच कार्यालये सुरू ठेवायची आहेत. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी जारी केले.

नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अनावश्‍यक हालचाली बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अत्यावश्‍यक कारणे किंवा उद्योग व्यवसायाच्या कारणाव्यतिरिक्त एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागातही जाण्यास बंदी आहे. ही बंदी पालिकेच्या हद्दीजवळील गावांच्या सीमांनाही लागू आहे. अशा 
गावांतील नागरिकांच्या अनावश्‍यक हालचाली प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. गावांतील नागरिकांनी अत्यावश्‍यक कारणे किंवा उद्योग-व्यवसायाच्या कारणाव्यतिरिक्त एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा इचलकरंजी पालिका हद्दीमध्ये जाण्यास प्रतिबंध केला आहे. मोर्चे, सभा, आंदोलनांनासुद्धा मनाई आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन निवेदन देण्याससुद्धा बंदी आहे.

रस्त्यावरील हातगाडीवर खाद्यपदार्थ किंवा इतर सर्व प्रकारच्या उघड्यावरील व रस्त्यावरील विक्रीवर बंदी आहे. यामध्ये भाजीपाला व जीवनावश्‍यक वस्तूंना सूट आहे; परंतु यावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे निर्बंध लागू राहणार आहेत. प्रतिबंधित आदेश लागू असणाऱ्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे व दुकाने किंवा इतर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, औद्योगिक व इतर आस्थापनांनी त्यांचे नियमित कर्मचारी संख्येच्या पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित ठेवता येणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापनेत निर्जंतुकीकरण, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक बाबींचे बंधन कायम आहे. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक-प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शैक्षणिक कामकाजास बंदी आहे. शिक्षणेत्तर कामकाज उदा. ई-सामुग्री विकास, उत्तरपत्रिकांचेमूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदींना यातून वगळण्यात आले आहे.

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, तसेच इतर मेळाव्यांनाही मनाई आहे. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे ही नागरिकांसाठी बंद ठेवली जातील. धार्मिक कार्यक्रम घेण्यासही मनाई आहे.

प्रवासी वाहतूकही बंद
लग्न, मुंज, साखरपुडा, वाढदिवसासह सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमास बंदी असणार आहे. केशकर्तनालये, स्पा, सलुन्स्‌, ब्युटी पार्लर्स आदी बंद राहणार आहे. ऑटो रिक्षा, काळी पिवळी, टेंपो ट्रॅव्हलर आदी प्रवासी वाहतुकीलाही बंदी आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com