इचलकरंजीतील लॉकडाऊन शनिवारपासून होणार शिथील.... 

Lockdown in Ichalkaranji will be relaxing from Saturday
Lockdown in Ichalkaranji will be relaxing from Saturday

इचलकरंजी - शहराला 14 एप्रिलपर्यंत केलेल्या 100 टक्के लॉकडाऊनमधून इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार (ता.4) पासून सकाळी 6 ते 11 या वेळेत सर्वच जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला, धान्य, किराणा माल, मटण, चिकन, रेशन, जनावरांचा चारा यासह सर्वच जीवनावश्यक वस्तू प्रत्येक दिवशी मिळणार आहेत. खरेदीच्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांना सोशल डिस्टन्स व मास्क बंधनकारक केले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.

इचलकरंजी शहराची लोकसंख्या लक्षात घेता जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये एकाच दिवशी ठराविक कालावधीत सर्व जीवनावश्यक साहित्य खरेदी करणे नागरिकांना अशक्य होते. या पार्श्‍वभूमीवर प्रांत कार्यालयात गुरूवारी यावर सविस्तर चर्चा करून या लॉकडाऊनमधून शहरातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शनिवारपासून सकाळी 6 ते 11 या वेळेत नागरिकांना हवी असणारी प्रत्येक जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहे. नगरपालिकेने निश्‍चित केलेल्या शहरातील 22 ठिकाणी भाजीपाल्याची विक्री होणार आहे. सकाळच्या सत्रात नियमीतप्रमाणे दुध विक्री सुरू राहणार आहे. खरेदीसाठी कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती बाहेर पडणे बंधनकारक केले असून वाहनाचा वापर टाळण्याच्या सुचना केल्या आहेत. लॉकडाउनमुळे बंद पडलेल्या कारखान्यामुळे अनेक कामगार घरीच बसून आहेत. अशा कामगारांना सर्व कारखानदारांनी अ‍ॅडव्हान्स पगार, अन्नधान्य व आवश्यक गरजा पुरविणे बंधनकारक असून नियम मोडणार्‍या कारखानदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील स्थानिक जनावरांची संख्या लक्षात घेता वैरण बाजार परिसरात होणारे चार्‍याचे विक्रीलाही मुभा देण्यात आली असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीस नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, आमदार प्रकाश आवाडे, मुख्याधिकारी दिपक पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, तहसीलदार प्रदीप उबाळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे आदी उपस्थित होते.

गर्दी टाळून रेशन वाटप

शहरात रेशनकार्ड धारकांची संख्या मोठी असल्याने रेशन वाटप करताना गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक रास्तभाव दुकानदारांकडे असणार्‍या रेशनधारकांची सरासरी संख्या लक्षात घेऊन शनिवारपासून सकाळी 6 ते 11 या वेळेत त्यांना धान्य वाटप केले जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराला त्यांच्याकडे असणार्‍या कार्डधारकांपैकी दररोज 50 लाभार्थ्यांना आधी संपर्क साधावा लागणार आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला दिलेल्या वेळेनुसार अनावश्यक गर्दी टाळून चालू महिन्याचे धान्य वाटप केले जाणार आहे.

  •  शनिवारपासून सकाळी 6 ते 11 नागरिकांना खुले
  • या कालावधीत गाडी वापरता येणार नाही
  • किराणा दुकानसह बेकरी व जीवनावश्यक वस्तू मिळणार
  •  सोशल डिस्टन्ससह मास्क बंधनकारक
  •  निश्‍चित केलेल्या ठिकाणी चारा व भाजीपाल्याची विक्री
  •  दररोज 50 लाभार्थ्यांना मिळणार रेशन दुकानात धान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com