Marathi bhasha din 2020 "अक्षरा'चा मराठीत मानाचा तुरा 

marathi akshara software development for marathi spelling check
marathi akshara software development for marathi spelling check

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी! एवढ्या जगात माय मानतो मराठी!! 

आज (ता. 27 फेब्रुवारी) जागतिक मराठी भाषा दिवस. याच मराठी भाषेवर भरभरून प्रेम करतो, तुम्ही-आम्ही सर्वच जण. परंतु, याच भाषेचे अलीकडे आपल्याला वावडे वाटू लागले आहे. काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने अनेक जण हैराण झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चालल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या राज्यात आज मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी आंदोलने करावी लागतात, हे दुर्दैवच. परंतु, हीच मराठी भाषा अवघड वाटणाऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे कोल्हापुरातील एक तरुण. तीन ते चार वर्षे राबून या तरुणाने इंग्रजी स्पेलचेकप्रमाणे मराठीमध्ये शुद्ध शब्दलेखन (Spell Check) सुविधा उपलब्ध केली आहे. निवास पाटील यांनी "अक्षरा' या नावाने मराठीचे स्पेलचेक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 

कार्यालयीन कामकाजाबरोबर मराठीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी अचूक वापरण्यासाठी या प्रणालीची मदत होणार आहे. यामध्ये मराठी टायपिंग करत असताना टाईप होत असलेल्या शब्दांबद्दल त्याखाली सूचना बॉक्‍स दाखविला जातो. त्यामधून आपल्याला पाहिजे तो शब्द निवडता येतो. मराठीमध्ये काम करत असताना जास्तीत जास्त ऱ्हस्व-दीर्घ चुकीच्या पद्धतीने मांडले जातात. या चुका होऊ नये, म्हणून यामध्ये "ऍटो करेक्‍शन' ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. टाईप होत असलेला शब्द ऱ्हस्व व दीर्घ मांडणीमुळे चुकला असेल तर स्पेस मारल्यानंतर तो शब्द आपोआप बरोबर करेल. अशा स्पेलचेक सुविधेबरोबर मराठीमधील शब्दांचा अर्थही अगदी सहजरीत्या पाहण्यासाठी "अक्षरा' सॉफ्टवेअरचा चांगला उपयोग होणार आहे. शिवाय युनिकोड मजकूरदेखील कॉपी-पेस्ट केल्यानंतर तो एकाच वेळी तपासला जाईल व त्यामधील चुका दाखविल्या जातील. याचा वापर करण्यासाठी एकूण 19 कीबोर्ड उपलब्ध करून दिले आहेत. मराठी कीबोर्ड माहिती नसणाऱ्यांना Google Tools चा वापर करून किंवा बाराखडी कीबोर्डचा वापर करून अक्षरा या सॉफ्टवेअरचा वापर करता येतो. प्रत्येक वापरकर्त्यांकडून नवीन येणारे शब्द एकत्र करून, मिळालेले सर्व शब्द बरोबर आहेत याची खात्री करून ते सर्व शब्द इतर वापरकर्त्यांना अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. अशा या सर्व सुविधांयुक्त अक्षरा सॉफ्टवेअरमुळे आपली मराठी भाषा एका वेगळ्या उंचीवर जाईल व मराठी भाषा अचूक वापरण्यासाठी सोपी होईल. या पद्धतीचे सॉफ्टवेअर फक्त इंग्रजीमध्ये आहे. भारतातील इतर भाषेमध्ये अशा पद्धतीचे स्पेलचेक काम करणारे सॉफ्टवेअर निदर्शनास आलेले नाहीत. म्हणून हा पहिला प्रयोग त्यांनी अक्षरा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये आणला आहे. 

भारतातील आणखी इतर महत्त्वाच्या भाषांवर लवकरच काम सुरू होणार आहे व पुढील काही महिन्यांत मराठी भाषेबरोबर भारतातील इतर आठ प्रादेशिक भाषांना स्पेलचेकची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. 
- निवास पाटील, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com