तंत्रज्ञानाचा गैरवापर ; कोल्हापुरातील बाजार चालतो तेजीत : सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

सट्टा बाजारातील बुकी सामन्यादरम्यान अन्य जिल्ह्यात किंवा छोट्या खेड्यात जातात

कोल्हापूर : बेटिंग म्हणजे व्हाईट कॉलर गुन्हेगारांचा अड्डाच आहे. काल गांधीनगरातील कारवाईत बेटिंग घेणारा एक असला तरीही त्यांच्या मागे सांगलीसह पुण्यापर्यंत चाललेली साखळी मोडीत काढण्याचे आव्हान आहे. कारवाई स्वागतार्ह असली तरीही मटका बुकीसारखे त्यांच्या सूत्रधारापर्यंत गेल्यास अनेकांना पळताभुई थोडी होईल. हे धाडस आता नव्या पोलिस अधीक्षकांच्या कारकिर्दीत होणार काय?

सट्टा बाजारातील बुकी सामन्यादरम्यान अन्य जिल्ह्यात किंवा छोट्या खेड्यात जातात. फोनवरून सट्ट्याची बोली घेतात. मॅच संपल्यावर हिशेब होतो. जिंकलेल्यांना तीनेक दिवसांत रक्कम पोहोच केली जाते. हरलेल्यांकडून वसुलीही केली जाते. बुकी आपल्या खात्रीलायक ग्राहकांचाच सट्टा लावतात किंवा खात्री देणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांचाही सट्टा लावतात. हे सर्व व्यवहार रोखीने असल्याने कागदावर कोणीच येत 
नाही. त्यामुळे सूत्रधारापर्यंत पोहोचता येत नाही.

हेही वाचा- दांपत्याची आळवणी दारातूनच  : घेईल मानून अंबाबाई... आता तरी जावी रोगराई! -

कोल्हापुरातील सट्टाबाजार
शहरातील सट्टाबाजार तेजीत चालतो. इथे भागनिहाय बुकी आहेत. ग्राहकही ठरलेलेच आहेत. ‘रॉबिन’ आणि ‘शिवन’ गांधीनगरमधले तर ‘बबलू’, ‘संतोष’, ‘डी.एम.’ मंगळवार पेठ आणि आसपासच्या परिसरातील बुकी आहेत. ‘एन.ओ.’ हा गंगावेश दुधाळी परिसरात असून क्रिकेटसह निवडणुकांवरही तो सट्टा लावतो. ‘विल्सन’ हा शाहूपुरीमध्ये सक्रिय आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. हे सर्व स्वतंत्रपणे काम करतात. पैसे कोणाकडे द्यायचे नक्की असते. या सर्वांचा सूत्रधार वेगळाच आहे. हे सर्व १० टक्के कमिशनवर काम करतात. ज्याची वसुलीची जेवढी क्षमता असते तो तेवढ्या रक्कमेचा सट्टा घेतो. 

कडक कारवाईची गरज 
राजारामपूरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी बेटिंग करणाऱ्या महापालिकेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई केली होती. रुबाबात वावरणाऱ्या त्या पदाधिकाऱ्याला पोलिस गाडीतून मुख्यालयात नेले होते. अशा कारवाईची गरज आहे.

सेशनवर लागतो सट्टा
सामन्यामध्ये किती ओव्हरमध्ये किती धावा निघणार यावर सट्टा लावला जातो. (उदा. पहिल्या पाच ओव्हरमध्ये किती रन) त्याची रक्कम अधिक असते. याशिवाय सामना कोण जिंकणार यावरही सट्टा लावला जातो.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misuse of technology The market in Kolhapur is booming