आमच्या कार्यक्रमात माणसे घुसवून दाखवाच...

MLA Chandrakant Jadhav Challenge to former MP Dhananjay Mahadik.
MLA Chandrakant Jadhav Challenge to former MP Dhananjay Mahadik.

कोल्हापूर - मेरी वेदर मैदानावर माजी खासदारांच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमात कोणताही अडथळा न करता युवा खेळाडू व मॉर्निग वॉकर नागरिकांच्या हितासाठी निदान यापुढे तरी असे बिगर क्रीडा प्रकाराचे कार्यक्रम शहरातील इतर उपलब्ध ठिकाणी घेण्याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून संयोजकांना मी आव्हान केले होते. त्यावर न बोलता उलट आमच्या कार्यक्रमात गुंड घुसवून कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा जर माजी खासदार करत असतील, तर त्याला आम्ही भीक घालत नाही. आमच्या कार्यक्रमात माणसे घुसवून कार्यक्रम उधळून दाखवाच, असे आव्हान आमदार चंद्रकांत जाधव यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना पत्रकाद्वारे दिले.

मी उपरा नाही...

पत्रकात म्हटले आहे, मी उद्योजक आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर मी पेठेतील मूळ निवासीही आहे, हे माजी खासदारांनी ध्यानात ठेवावे. आपल्यावर गुंडगिरी होते असे म्हणणे हे जरा लांच्छनास्पदच आहे. मी उपरा नाही, हे महाडिक आणि कंपनी विसरलेत का? मी प्रथम शहराचा नागरिक, नंतर खेळाडू, उद्योजक व आता लोकप्रतिनिधी आहे. शहराच्या सर्वांगीण हिताची जपणूक करणे माझे कर्तव्य आहे.
क्रीडांगणे ही शहराची फुफ्फुसे आहेत. एक खेळाडू म्हणून क्रीडांगणाची निगा राखणे व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधील आहे. मेरीवेदर ग्राऊंड हे शहरासाठी मध्यवर्ती क्रीडांगण आहे. त्याचा दररोज सकाळी व सायंकाळचा विविध क्रीडा प्रकाराने फुललेला नजरा विलोभनीय असा असतो. त्यामुळे या क्रीडांगणावर क्रीडा प्रकाराव्यतिरिक्त इतर कोणतेही कार्यक्रम होऊ नयेत, अशी झालेली मागणी व वस्तुस्थिती विचारात घेऊन महानगरपालिकेने क्रीडांगण क्रीडा प्रकाराव्यतिरिक्त न वापरणेचा एकमताने निर्णय घेतला. असे असताना माजी खासदारांनी खेळाडू व जनतेचा प्रखर विरोध डावलून युती सरकारच्या सत्तेत त्यावेळचे पालकमंत्री यांच्या दबावाने शेतकऱ्यांचे हित भासवून दरवर्षी प्रमाणे स्वत:चे कोट कल्याण करणारे कृषी प्रदर्शन भरवून खेळाडूंची गैरसोय केली. अशा प्रकारे महाडिक आणि कंपनी यांनी खेळाबरोबर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक आरोग्याची खांडोळी केली आहे, असा टोलाही श्री. जाधव यांनी लगावला आहे.

पराभवाने ते भरकटलेत

 महानगरपालिका व शासन निर्णयाच्या अनुषंगाने खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी खेळाडूंना आश्वस्त केल्याप्रमाणे येथील विविध क्रीडा मंडळ व नागरिकांनी मला प्रत्यक्ष भेट्रन व निवेदनाद्वारे क्रीडांगण वापरातील हा गैरप्रकार थांबवणेची विनंती केली. एका पाठोपाठ एक होत असलेले पराभव व ‘गोकुळ’मध्ये होणारा कडेलोट त्यांना असहनीय झाला आहे. माजी खासदार पराभवामुळे भरकटले असून, त्यांचा सोशल मीडिया व माध्यमांचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी थेट पाईप लाईन प्रकल्प, वाहतूक समस्या, फेरीवाल्यांचे पुनवर्सन, पूरग्रस्त मदत व पुनर्वसन, वीज दरवाढ विरोध तसेच खेळाडूंना प्रोत्साहन या बाबींसाठी मी महानगरपालिका ते शासनस्तरापर्यत करीत असलेल्या पाठपुराव्याची त्यांना कल्पना ती काय असणार? असाही टोला या पत्रकात लगावला आहे.

प्रदर्शनांना आमच्या शुभेच्छा

पराभूतांनी आताच्या लोकप्रतिनिधींना लाखोली वाहण्याचे उद्योग त्यांनी चालूच ठेवले आहेत. हे त्यांनी बंद करावे, असेही या पत्रकात म्हटले आहे. क्रीडांगणाचे नुकसान तसेच खेळाडूंना इजा व त्रास होऊ नये, याची काळजी म्हणून यापेक्षाही मोठी अशी प्रदर्शने इतर ठिकाणी घ्यावीत, यासाठी आमच्या सदिच्छा व शुभेच्छा असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com