वीज बिलप्रश्‍नी जयसिंगपूरमध्ये ठिय्या आंदोलन

Movement In Jaishingpur Kolhapur Marathi News
Movement In Jaishingpur Kolhapur Marathi News

जयसिंगपूर : वीज बिल वसुली करताना कर्मचारी दमदाटी करत आहेत. चुकीची बिले दुरुस्त न करताच ती भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. वीज कनेक्‍शन तोडण्याचीही धमकी दिली जात आहे. कर्मचाऱ्यांची दमदाटी बंद करावी तसेच लॉकडाऊनमधील वीज बिल माफ करुन ग्राहकांना दिलासा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्यावतीने येथील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. तक्रारीची दखल घेऊन प्रश्‍न मार्गी लावू अशी लेखी ग्वाही मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केले. 

आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, "लॉकडाऊनमध्ये उद्योग, व्यवसाय बंद असल्याने कोणाच्या हाताला काम नाही की खिशात दाम नाही अशी स्थिती असताना वीज ग्राहकांना वीज बिले भरण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून दादागिरी केली जात आहे. बिले भरण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या तक्रारींचीही दखल घेतली जात नाही. बिले दुरुस्त न करुन देताच ती न भरल्यास कनेक्‍शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. मंत्र्यांनी लॉकडाऊनमधील वीज बिले माफ करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, नंतर त्यांनी यात यु टर्न घेत पुन्हा वीज बिले भरावी लागतील असे सांगत ग्राहकांची फसवणूक केली आहे. 

लॉकडाऊनमधील बिले माफ करुन ग्राहकांना दिलासा देण्याची गरज असताना मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ठिय्या आंदोलन केले. वीज कायद्यानुसार पंधरा दिवसाची नोटीस दिल्याशिवाय वीज कनेक्‍शन तोडता येत नाही. मग ग्राहकांना कनेक्‍शन तोडण्याची भिती दाखवली जात आहे. वीज बिलाची तक्रार असेल तर या तक्रारीवर सुनावणी घेवून निर्णय देण्याची गरज आहे. असे असताना महावितरण कडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्याचबरोबर व्याज, दंड व्याज, युनिट व दर टाकून अवास्तव आलेली बिले हप्त्यांनी भरावीत असे सांगितले जात आहे. 

महावितरणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळे यांनी आपल्या मागण्या पुर्ण केल्या जातील असे लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. अभिजित पाटील, अक्षय पाटील, अविनाश लाड, शाहिर बाणदार, विजय माणगावे, बाळासो नरदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com