महावितरणला वाढीव बिलाचा कोरोना झालाय...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

वाढीव बिल देऊन जनतेची लूट होणार असेल तर महावितरणला शासनातर्फे समज देण्याचा इशारा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज येथे दिला.

कोल्हापूर : वाढीव बिल देऊन जनतेची लूट होणार असेल तर महावितरणला शासनातर्फे समज देण्याचा इशारा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज येथे दिला. वाढीव विलाबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला. त्या वेळी प्रा. मंडलिक यांनी ही भूमिका घेतली. बिलावरून सामाजिक असंतोषाची भावना महावितरणविरूद्ध बळावली असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

या वेळी प्रा. मंडलिक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरताना ग्राहकांना होणाऱ्या मनस्तापाची उदाहरणे दिली. आमदार चंद्रकांत जाधव यांनी बिले जास्त आल्याची तक्रार केली. जिल्हाध्यक्ष संजय पोवार यांनी महावितरणला वाढीव बिलाचा कोरोना झाल्याचे सांगत वाढीव बिलातून जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप केला. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांनी बिले भरायची कशी, असा प्रश्‍नही उपस्थित केला. 

बिल भरूनही एका ग्राहकाला बारा हजार रूपये बिले आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिले कमी झाली नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी मीटर रिडिंग एजन्सी करणाऱ्या एजन्सींची नावे सांगण्याचा आग्रह धरला. त्यांचे बिलाचे रिडींग करण्याचे काम थांबवावे, अशी मागणी केली.

ए, बी, सी, डी, ई वॉर्डातील कार्यालयात वीज तक्रार कक्ष स्वतंत्र करून तेथे विनामूल्य ग्राहकांच्या मीटर तपासणी व वाढीव बिलाच्या तक्रारी घ्याव्यात, त्यांचे तीन दिवसांत निराकरण करावे, शहरातील घरगुती व व्यावसायिक वाढीव वीज बिले रद्द करावीत, वाढीव वीज बिलाच्या यंत्रणेची त्रिसदस्यीय समितीतर्फे चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, राजू यादव, विराज पाटील, बाजीराव पाटील, राजेंद्र जाधव, दिलीप देसाई यांचा समोवश होता. 

वीज पुरवठा खंडित नाही... 
अधीक्षक अभियंता सागर मारूलकर यांनी वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केलेला नाही. कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करणार नाही. तसेच बिल भरा म्हणून सक्तीही केली जाणार नाही, असे सांगितले. 

दृष्टिक्षेप 
- शासनातर्फे महावितरणला समज देऊ : मंडलिक 
- महावितरण अधिकारी खासदार मंडलिकांकडून धारेवर 
- बिलाच्या रिडींगचे काम थांबविण्याची मागणी 
- वीज तक्रार कक्ष स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारी ऐका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL gets corona of increased bill ...