कोल्हापुरात आरोग्य जागर : घरात कोणी आजारी आहे का?

मतीन शेख
Wednesday, 16 September 2020

प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे सुरू, खबरदारीचे आवाहन 

कोल्हापूर : सकाळी ११ ची वेळ. स्थळ होतं, मंगळवार पेठेतील एक गल्ली. सकाळी प्रत्येक घरात आवराआवर सुरू होती. घरातील महिला स्वयंपाकात व्यग्र होत्या. इतक्‍यात दोन आशा कर्मचारी, सोबत आणखी दोन स्थानिक स्वयंसेवक आले. एक आशा एका घराच्या दारात थांबली आणि मोठ्याने म्हणाली, ‘घरात कोणी आजारी आहे का?’ त्यावर हॉलमध्ये बसलेली ज्येष्ठ व्यक्ती मास्क न लावताच लगबगीने समोर आली आणि म्हणाली, ‘कोणी नाही आजारी.’ 
 

त्यावर आशा म्हणाली, ‘मास्क लावा पहिला मामा.’ मग मामा म्हणाले, ‘आता घरात कशाला मास्क लावायचा?’ त्यावर आशाने त्यांची समजूत काढली आणि हातावर सॅनिटायझर देत समजावून सांगितले. हे चित्र शहरात आज सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च्या मोहिमेचे. हे सर्वेक्षण कशा पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा घेणारा ग्राउंड रिपोर्ट....

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवली जात आहे. 
१५ सप्टेंबर ते २५ ऑक्‍टोबर दरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. शहरात महानगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचारी घरोघरी जात सर्वेक्षण करत, कोरोनापासून कसे दूर राहायचे, याचे आरोग्य शिक्षण प्रत्येक कुटुंबाला देत आहेत. 

हेही वाचा- ताटांचे गणित बसेना  ; धड पार्सलही नाही आणि हॉटेलमध्ये बसण्यासाठी परवानगी नाही, करायचे काय...? -

हातात थर्मल स्कॅनर गन, ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर आणि हातात वही-पेन घेत प्रत्येक घराच्या दारात दोन आशा कर्मचारी किंवा आरोग्य कर्मचारी हजर होतात. त्या परिसरातील स्त्री-पुरुष अशा दोन सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक त्यांच्याबरोबर आहे. घरात पन्नास वर्षांवरील नागरिक किती आहेत? लहान बाळ आहे का? कोणाला ताप, थंडी आहे का? सर्दी, खोकला आहे का? असे अनेक आरोग्याबाबतचे प्रश्‍न घरोघरी विचारले गेले आणि आरोग्याचा जागरच यानिमित्ताने झाला.

अशी घेतली जाते नोंद... 
घरातील ५० वर्षांवरील व्यक्तींचे नाव, वय, मोबाईल नंबर घेत त्यांचे थर्मल गनने तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल तपासतात. तसेच मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, किडनी विकार असे गंभीर आजार त्यांना आहेत का? अशी विचारणा केली जाते. त्याची नोंद घेतली जाते. घरातील सदस्यांपैकी आधी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आले असेल तर त्यांनी घ्यायची काळजी तसेच कोरोनाला दूर ठेवण्याचे उपाय सांगितले जातात. 

हेही वाचा-नियमित आहारात अंडी खाताय मग ही बातमी वाचाच....

काम असेल तरच बाहेर पडा... 
 घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी घरात येताच, वृद्ध व्यक्ती, बालके यांच्यापासून दूर राहत सॅनिटाइझ करून घ्यावे. आहार, औषधांची आवश्‍यक काळजी घ्यावी. आवश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना कर्मचारी करतात. 
 

लक्षणे आढळल्यास फोन
सर्दी, खोकला तसेच कोरोनासंबंधित लक्षणे आढळल्यास त्यांच्या नावाची वेगळी नोंद करत ही नावे आरोग्य अधिकाऱ्यांना कळवली जातात. त्यानंतर त्या सदस्यांना फोन करत त्यांच्या आरोग्याची विचारणा करून कोरोना तपासणी करण्याची सूचना केली जाते.

दृष्टिक्षेपात... 
 आरोग्य कुटुंब कल्याणनिहाय सर्वेक्षण पथके : २०६ 
 अधिकारी - कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी- ६१८ 
 आशांसमवेत सामाजिक कार्यकर्ते - २

संपादन -  अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My family My Responsibility Ground Report Survey of every family started caution appealed