कार्यकर्त्यांच्या गराड्यात शरद पवार:सर्किट हाउसवर जल्लोषी स्वागत 

सदानंद पाटील
Friday, 22 January 2021

सुरक्षारक्षकांना बाजूला सारत स्वीकारल्या शुभेच्छा

कोल्हापूर :राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणल्यानंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व कुटुंबीयांचे सर्किट हाउस येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. खासदार पवार यांचे सर्किट हाउस येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. कार्यकर्त्यांना अडविणाऱ्या सुरक्षारक्षकांना बाजूला सारत पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. सुमारे तासभर कार्यकर्ते व पदाधिकारी पवारांना भेटत होते. यात महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

जिल्हा परिषदेत उभारलेल्या माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या (ता. २२) होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यासाठी पवार सहकुटुंब रात्री साडेआठ वाजता सर्किट हाउस येथे दाखल झाले. त्यांचे स्वागत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, उद्योगपती व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,  माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर आदींनी केले.

प्रमुख नेत्यांच्या स्वागतानंतर पवार विश्रामगृहात पोहोचले. तेथे उद्याच्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली. त्यानंतर काही वेळात त्यांनी भेटावयास येणाऱ्या लोकांची भेट घेतली. या वेळी काही शिष्टमंडळांनीही भेट घेत पवार यांना निवेदने सादर केली. वर्षभरानंतर पवार कोल्हापुरात आल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह होता. महत्वाचे म्हणजे यावेळी भेटणाऱ्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. आज भेटलेल्या काही शिष्टमंडळांना वेळ देता न आल्याने पुन्हा त्यांना उद्या भेटण्याबाबत सूचना केल्या. 

दौऱ्यात ऐनवेळी झाला बदल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा शुक्रवार व शनिवार असा पूर्वनियोजित कोल्हापूर दौरा होता. मात्र, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूला आग लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या नियोजित दौऱ्यात बदल केला आहे. उद्या (ता. २२) ते दुपारनंतर पुण्याला रवाना होणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party President MP Sharad Pawar visit atmosphere in kolhapur politics marathi news latest news