कोल्हापुरात कुठे दिली जायची फाशीची शिक्षा ? वाचा कोणतं आहे ते ठिकाण..

सुनील ई. पाटील
शनिवार, 21 मार्च 2020

निर्भया प्रकरणातील चौघांना आज फाशी देण्यात आली. यानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौक सबजेल येथील जुन्या फाशी गेटची स्मृती जागी झाली. कोल्हापूरच्या या सर्वांत जुन्या तुरुंगात फाशीची शिक्षाही दिली जायची. तुरुंगात खोड्याच्या शिक्षेचीही कोठडी होती (हाता-पायात साखळदंड). या तुरुंगात शेवटची फाशी शिवाजी पेठेतील बापू साळोखे यास झाली. त्याने भरदिवसा कुऱ्हाडीचे घाव घालून कुटुंबातील चौघांचे खून केले होते. त्यानंतर फाशी गेट बंद करण्यात आले व फाशी येरवडा कारागृहात देण्यास सुरवात झाली. 

कोल्हापूरचे एकेकाळी गावचे टोक म्हणून ओळखला जाणारा भाग आता विस्ताराने शहरात मध्यभागी आला आहे. त्याकाळी शहराच्या टोकाला पिंपळाचे झाड आणि त्याखाली मारुतीचे मंदिर ही वेशीची हद्द होती. कोल्हापूरचा बिंदू चौक ही मूळची रविवार वेस. याठिकाणी दगडी तटबंदी आणि त्या पुढे गाव नव्हते. याठिकाणी दोन मारुतीची मंदिरे होती. त्यातील एक मंदिर आणि पिंपळाचा पार अजूनही बिंदू चौकात आहे. दुसरा मारुती कमानीलगत होता. त्या मारुतीचे मंदिर जेलच्या आतील भागात आहे. 

वाचा - सर्वांना टोप्या घालणारे गाव, तुम्हाला माहित आहे का..? 

सुमारे १२ हजार खर्च करून १८४७-४८ मध्ये तुरुंग बांधण्यात आला. नंतर १८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूचे नवीन बांधकाम करण्यात आले. या मंदिरासमोरच जुने फाशी गेट आहे. संस्थानकाळ, स्वातंत्र्य चळवळीपासून अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेले हे कारागृह कोल्हापूरचे मुख्य कारागृह होते. आता ‘बिंदू चौक’ असे नाव असले तरीही पूर्वी बाराईमाम म्हणून 
ओळख होती. तत्पूर्वी कोल्हापूरचे कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते, तर बिनखांबी गणेश मंदिराजवळ रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या होत्या.नंतर या ठिकाणी दगडी बांधकाम करून हे फाशीगेट बंदिस्त करण्यात आले. नंतरच्या काळात या ठिकाणी एमएसईबीचा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. बारकाईने निरीक्षण केल्यास या जुन्या फाशी गेटचे अवशेष अजूनही लक्षात येतात. 

दृिष्टक्षेप... 

 संस्थान काळात फाशी गेट अस्तित्वात 
 बिंदू चौक तुरुंग बांधकामास १२ हजार रुपये खर्च
 १८७३ मध्ये तुरुंगाच्या उत्तर बाजूस नवीब बांधकाम
  रंकभैरव मंदिराच्या परिसरात अंधार कोठड्या
 जुने कारागृह गुजरीत निंबाळकर वाड्याजवळ होते
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old hanging gate at Bindu Chowk Subjail The oldest jail in Kolhapur

टॅग्स
टॉपिकस