तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार ; घटनास्थळी माणुसकी बोथट 

गणेश शिंदे
Monday, 30 November 2020

अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून तिघा जखमींवर जयसिंगपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) गावच्या हद्दीत ट्रक, आयशर टेम्पो आणि कार यांच्यातील तिहेरी अपघातात एक जण जागीच ठार झाला. दादासो जंबू सुल्तानावर (वय 38, रा. पट्टणकुडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या आयशर चालकाचे नाव आहे.

अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून तिघा जखमींवर जयसिंगपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामुळे महामार्गावर तासभर वाहतूक ठप्प राहिली. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. 

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील चिपरीच्या हद्दीत दुपारी झालेल्या अपघाताच्या आवाजाने परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि मजूरांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत मदतकार्य राबविले. तर अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मालवाहू आयशर टेम्पो आणि कार कोल्हापूरहून जयसिंगपूरच्या दिशेने येत होते. तर ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात असताना समोरासमोर जोराची धडक बसल्याने हा तिहेरी अपघात झाला. 

हे पण वाचा - आधी परवानगी घ्या, मगच ‘शुभमंगल’ म्हणा ! ; प्रशासनाचा निर्णय  

आयशर चालक दादासो जंबू सुल्तानावर जागीच ठार झाला. तर कारमधील श्रीनिवास चंद्रकांत कंबळे, प्रशांत महादेव डांगे, अरशन मुक्तारअहमद पटेल या तिघा जखमींना जयसिंगपूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून ट्रक आणि आयशरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. जखमी श्रीनिवास कांबळे यांनी अपघाताची फिर्याद जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागून राहिल्या. जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने पंचनामा करुन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. 

हे पण वाचा आयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला

मदतीला कमी; फोटोसाठीच पुढे 
अपघातानंतर जवळपास काम करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, मदतकार्य राबविणाऱ्यांपेक्षा अपघाताचे फोटो काढण्यासाठीच अनेकांनी आपले मोबाईल बाहेर काढले. अपाघातानंतर सुमारे दहा ते पंधरा मिनीटांनी पोलिसांना माहिती मिळाली. मात्र, अपघातानंतर लगेचच फोटोग्राफीसाठी मात्र मोबाईल सुरु असल्याने माणुसकी शिल्लक आहे की नाही असा सूर गर्दीत ऐकायला मिळाला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident on kolhapur sangli highway