अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा : श्रीराम पवार

Online lecture by Dalit Swayamsevak Sangh
Online lecture by Dalit Swayamsevak Sangh

कोल्हापूर - विविधता हे भारताचे बलस्थान आहे. मात्र, त्याला विविध जागतिक वैचारिक प्रवाहातून तडा देण्याचे काम सध्या सुरू आहे. विषमतेला पूरक गोष्टींवर जाणीवपूर्वक भर दिला जात असताना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची केवळ देशालाच नव्हे, तर जगाला गरज असल्याचे स्पष्ट मत ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.

दलित स्वयंसेवक संघातर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. ‘जागतिक प्रवाह आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून हे व्याख्यान झाले. दरम्यान, जन्मशताब्दीच्या निमित्ताने जगभरात अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर व्हावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील प्रभाव, साहित्यातून त्यांनी दलित, शोषित, पीडितांच्या वेदनांबाबत केलेला प्रहार असो किंवा त्यांचे एकूणच साहित्य आणि देशांतर्गत व जगभरातील विविध प्रश्‍नांचा तौलनिक अभ्यास मांडत संपादक संचालक श्रीराम पवार यांनी विस्तृत विवेचन केले. 

एकीकडे एकविसाव्या शतकात भेदाच्या भिंती गळून पडल्या, असे आपण म्हणत असलो तरी ते नक्कीच वरवरचे भाष्य आहे. 
कणखर नेतृत्व या नावाखाली आता जगभरात एक प्रवाह पुढे येत असून, तो कुणाला तरी खलनायक ठरवतो आहे. त्याचे जाणीवपूर्वक विकृतीकरण करतो आहे आणि राजरोसपणे या साऱ्या गोष्टी सुरू आहेत. त्यातून विषमता आणखी वाढीला लागते आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर अण्णा भाऊंचे साहित्य आजही मार्गदर्शक असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

विसंगतीवर मार्मिक प्रहार

श्रीराम पवार म्हणाले, ‘‘अण्णा भाऊंच्या साहित्यावर सुरवातीला ग्रामीण भागाचा प्रभाव राहिला. त्यांनी गावगाड्यातील विसंगतींवर प्रहार केला. पुढे मुंबईत गेल्यावर मायानगरीतील विसंगतींवरही त्यांनी तितक्‍याच मार्मिकपणे प्रहार केला. जातीपातींची उतरंड आणि विषमता या दोन गोष्टींवर त्यांनी जाणीवपूर्वक भर देत या विषयांवर अगदी टोकदारपणे लेखन केले. त्यातून पीडित समाजही जागा झाला.’’

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com