तीव्र संपर्कातील व्यक्तीच पॉझिटीव्ह 

Only people in intense contact are positive
Only people in intense contact are positive

कोल्हापूर : जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर असताना गेल्या चार दिवसापासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. यात कोरोनाग्रस्तांच्या तीव्र संपर्कातील व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे गरजेचे झाले आहे. असे असले तरी कोणत्याही आजारांची लक्षणे नसताना, स्वॅब निगेटिव्ह असताना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईन) केले जात आहे. त्यामुळे अनेकांनी क्वारंटाईनचा धसका घेतला आहे. 

गेल्या चार दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने सामाजिक संसर्ग सुरू झाल्याची सरसकट चर्चा सुरू आहे. मात्र, कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या तीव्र संपर्कात आलेल्या व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत तर अन्य कमी संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे अपवाद वगळता सामाजिक संसर्गाचे चित्र फारसे ठळक नाही. 
गेल्या अडीच महिन्यात कोल्हापूरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 765 पर्यंत पोहचली होती. यात गेल्या महिन्यात सर्वाधिक म्हणजे किमान 25 ते 60 व्यक्ती एका दिवसात कोरोना बाधित आढळलेल्या होत्या. त्यामुळे येथे चिंता नक्की होती. या कोरोनाग्रस्तांपैकी 98 टक्के व्यक्तीं बाहेरगावावरून कोल्हापूरात आल्याचे नोंद आहे. त्यामुळे बाहेरगावावरून विशेषतः पुणे, मुंबई, सोलापूर भागातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणे अत्यावश्‍यक बाब बनली आहे. 

इचलकरंजीत सोलापूरवरून आलेल्या व्यक्ती कोरोनाग्रस्त सापडल्या असून त्यांच्या कुटूंबातील अन्य चार व्यक्तीही कोरोना संसर्गीत आढळल्या असेच चित्र कोल्हापूरात न्यू कणेरकरनगरातील. येथे व्यक्ती मुंबईतून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्या. त्याही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या अशात वरील दोन्ही ठिकाणच्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या तीव्र संपर्कात आलेल्या विशेषतः त्यांच्या कुटूंबातील दोन-तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. अन्य कमी संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. वरील चित्र पाहता सामाजिक संसर्ग तीव्र नाही असे दिसते. 

दरम्यान, सामाजिक संसर्गाची भिती घालून ज्याला कोणतेही लक्षण नाही किंवा ज्या व्यक्तीची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली, अशा व्यक्तींना 5 ते 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण केले जाते. त्यासाठी डॉक्‍टर नसलेल्या अन्य व्यक्ती आग्रही राहतात. यातून काही कामानिमित्त एक-दोन दिवसासाठी येथे आलेल्या व्यक्ती येथेच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे परगावी असलेले कुटूंबीय चिंतेत आहेत तर काही व्यक्तींच्या खासगी नोकरीवर गंडातर येण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. कॅम्पीपाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

कोरोना रूग्ण स्थिती 

कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ः 765 
कोरोना मुक्त ः 703 
कोरोना उपचारार्थ ः 49 व्यक्ती 

दृष्टिक्षेप
- स्वॅब निगेटिव्ह असतानाही सक्तीने संस्थात्मक अलगीकरण 
- कमी संपर्कातील व्यक्तींचा स्वॅब निगटिव्ह 
- जिल्ह्यात सामाजिक संसर्ग नाहीच 
- कोरोनाग्रस्तांची संख्या 765 वर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com