गडहिंग्लज उपविभागात शेतमाल प्रक्रिया उद्योगांना वाव 

अजित माद्याळे
Monday, 30 November 2020

प्रक्रिया करता येण्याजोगा शेतमाल गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध असतानाही अपेक्षित असे प्रक्रिया उद्योग उभारण्यात यश आलेले नाही.

गडहिंग्लज : प्रक्रिया करता येण्याजोगा शेतमाल गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यात उपलब्ध असतानाही अपेक्षित असे प्रक्रिया उद्योग उभारण्यात यश आलेले नाही. मिरची, रताळी, बटाटा, नाचणी, काजू आदी शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना अजूनही येथे वाव आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रात शिल्लकीचे भूखंड नवउद्योजकांना साद घालत आहेत. "स्टार्ट अप'मध्ये विभागातील प्रक्रिया उद्योग भरारी घेऊ शकतील असे वातावरण असून नव्या उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. 

या उपविभागातील 70 टक्केहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. गडहिंग्लजला मिरची, भाजीपाला तर आजऱ्यात भात, नाचणा, बांबू, काजू आणि चंदगड तालुक्‍यात रताळी, बटाटा, नाचणा, काजू, भात आदी शेतमाल आहे. या प्रत्येक शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकतात. सध्या भात आणि काजू या शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. काजू प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना मिळाली आहे. आजरा व गडहिंग्लजच्या औद्योगिक क्षेत्रात मोठमोठे राईस मिल उभारले आहेत. 

गडहिंग्लजची औद्योगिक वसाहत 132 हेक्‍टरची आहे. या ठिकाणी केवळ 23 उद्योगच कार्यरत आहेत. 111 भूखंडाचे वाटप केले असले तरी उद्योग सुरू झालेले नाहीत. अद्याप 175 भूखंड शिल्लक आहेत. गडहिंग्लजपासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आहे. दळणवळणासाठी अतिशय उपयुक्त अशी गडहिंग्लजची औद्योगिक वसाहत आहे. यामुळे या ठिकाणी शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. तेथील पायाभूत सुविधाही चांगल्या तयार केल्या आहेत.

आजऱ्याची औद्योगिक वसाहत केवळ साडेसहा हेक्‍टरची आहे. या ठिकाणी काजू, भात, फळावरील प्रक्रिया उद्योगांसह इतरही कारखाने आहेत. आता येथे भूखंड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे नवउद्योजकांसाठी अजून 20 हेक्‍टरची गरज असून औद्योगिक महामंडळाने त्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. चंदगड तालुक्‍यातील हलकर्णी येथे एव्हीएच प्रकल्पाला हद्दपार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे. येथे औद्योगिकचे सुमारे 57 भूखंड शिल्लक आहेत. 20 भूखंड कमर्शियलसाठी शिल्लक असले तरी नैसर्गिक नाला, विद्युत वाहिन्या, अतिक्रमण आदी कारणांमुळे यातील बहुतांशी भूखंड वितरीत करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. 

उद्योगांना पोषक वातावरण 
शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी गडहिंग्लज उपविभागात वातावरण पोषक आहे. स्थानिक पातळीवरच शेतमाल उपलब्ध होणार आहे. पाणी, विजेसह स्थानिक मजुरांची उपलब्धताही चांगली आहे. तसेच शेती प्रक्रिया उद्योगांना केंद्र सरकार व राज्य शासनातर्फे अनुदान योजनाही कार्यरत आहेत. मुबलक जागाही आहे. वाटप केलेल्या भूखंडामध्ये अद्याप बहुतांशी उद्योजकांनी उद्योग सुरू केलेले नाहीत. त्यांच्यासह नवउद्योजकांनी शेतमाल प्रक्रियेत लक्ष घातल्यास या परिसराचा शाश्‍वत विकास फार लांब नाही. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunities For Agro-Processing Industries In Gadhinglaj Subdivision Kolhapur Marathi News