
शिरोली पुलाची (कोल्हापूर) : कोरोना संकटात अडचणीत आलेल्या कलाकारांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने ३० ऑगस्टपर्यंत पॅकेज जाहीर करावे ; अन्यथा ४ ऑक्टोबरला विधान भवनासमोर "आक्रोश आंदोलन" करण्याचा इशारा कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी दिला.
राज्यभरातील लाखो कलाकारांपुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समस्या आहेत. या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी कलाकार महासंघातर्फे आज पुणे बंगळुरु महामार्ग रोको आंदोलन केले.
अनिल मोरे म्हणाले, ‘‘राज्यभरातील लाखो कलाकारांपुढे अनेक समस्या आहेत. याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. आता तर कोरोनामुळे बॅंड, बॅंजो पथके, ऑर्केस्ट्रा ग्रुप, सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते ग्रुपमधील गायक, गायिका, वादक, निवेदक अडचणीत आले आहेत. यात अनेक गरीब कुटुंबे आहेत. इतर क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर झाली;
मात्र कलाकारांकडे दुर्लक्ष का? लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून कामे नाहीत. त्यांना आर्थिक मदतीसह मानसिक आधाराचीही नितांत गरज आहे.आता सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण इतर क्षेत्रातील उद्योगांसाठी सवलतीच्या योजना जाहीर झाल्या आहेत. तशाच प्रकारे या कलाकारांचीही दखल घेत, पॅकेज जाहिर करावे ; अन्यथा ४ ऑक्टोबरला विधान भवनासमोर "आक्रोश आंदोलन" करण्यात येईल."
हलगीचा कडकडाट करीत पंचगंगा पूला नजीक दर्गासमोर आंदोलक महामार्गावर आले. पोलीसांनी कलाकारांना आडवल्यानंतर काही आंदोलक महामार्गावरच आडवे पडले. अशा गोंधळाच्या वातावरणात कलाकारांनी सुमारे पंधरा मिनीट महामार्गावरील वाहतूक रोखली व विविध मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात नेऊन सोडून दिले.
जिल्हाध्यक्ष जयवंत वायदंडे, अनिता पाटील, राम कुंभार, विश्वास ढाले, उमर मुल्ला, शोभा पाटील, विकास साठे, महेश कदम, सात्तापा पाटील, सुनिल पाटील, उमेश अवघडे, विजय गावडे, गिरीश कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.