Video- छत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षिदार ; पावनखिंड फरसबंदीचा मार्ग अन्‌ कासारी नदीची घळ...

संदीप खांडेकर 
सोमवार, 13 जुलै 2020

सिद्दी जौहरच्या वेढ्यातून सुटका करून घेत छत्रपती शिवाजी महाराज निवडक बांदल मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने गेले.

कोल्हापूर : विशाळगडाच्या मार्गावर असणाऱ्या पांढरेपाणीपासून सहा किलोमीटरवर पावनखिंडीचा परिसर. सिद्दी जौहरच्या सैन्याने बांदल मावळ्यांना पांढरेपाणी परिसरात गाठले. येथूनच रणसंग्रामाला सुरवात झाली असावी, असा इतिहास अभ्यासकांचा तर्क आहे. मात्र, पावनखिंडीतल्या ज्या घळीत लढाई झाल्याचा निर्देश करण्यात येतो, त्याबद्दल अभ्यासकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे ही घळ तेथे निर्माण झालीच कशी, याभोवती त्यांचा प्रश्‍न घुटमळतो आहे. भूगर्भशास्त्र अभ्यासकांनी पुढे येऊन या प्रश्‍नाची उकल करण्याची आवश्‍यकता आहे. 

सिद्दी जौहरच्या वेढ्यातून सुटका करून घेत छत्रपती शिवाजी महाराज निवडक बांदल मावळ्यांसह विशाळगडाच्या दिशेने गेले. हा मार्ग नेमका कोणता, याबाबत तर्कवितर्क आहेत.

पांढरेपाणीतील जुन्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची वाट माहीत होती. अर्थात, तो फरसबंदीचा मार्ग होता, ज्याचे अवशेष आजही पांढरेपाणी ते पावनखिंडीपर्यंत मिळतात. काही मार्ग शेतजमिनीत बुजला गेला असावा. जुन्या पिढीला जरी हा मार्ग माहीत असला तरी तो प्राचीन मार्ग असावा, या मार्गावरून शिवकाळात दळणवळण होत असावे, याचा अंदाज त्यांना नव्हता. काही वर्षांपूर्वी फरसबंदीचा हा मार्ग उजेडात आल्यानंतर त्याचे महत्त्व पुढे आले. याच मार्गावरून शत्रुसैन्याला थोपवत बांदल मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. गजापूरच्या खिंडीत घनघोर युद्ध झाल्याचे संदर्भही कागदपत्रांतून पुढे येतात. त्याचबरोबर विशाळगडाच्या पायथ्यालाही युद्ध झाले होते, असेही कागदपत्रे सांगतात. पावनखिंडीतील ज्या घळीत युद्धाचा निर्देश केला जातो, त्याबाबत पर्यटक, अभ्यासक, मोहीमवीरांत साशंकता आहे. घळीत युद्ध होईलच कसे? हा प्रश्‍न त्यांना सतावतो. 
 
सकाळ फेसबुक, यूट्यूबवर आज दुसरा भाग 
सकाळ फेसबुक व यूट्यूबवर ‘पन्हाळा ते पावनखिंड’ रणसंग्रामाच्या थराराचा दुसरा भाग सोमवारी (ता. १३) प्रसारित केला आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके पावनखिंड परिसरात घडलेल्या इतिहासाची माहिती देणार आहेत. 

व्हिडिओ पाहा

 

 

पाच पावलांची स्मृतियात्रा आज
पन्हाळा ते पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे सोमवारी (ता. १३) पाच पावलांची स्मृतियात्रा काढण्यात येत आहे. नेबापुरातील वीररत्न शिवा काशीद ते नरवीर बाजी प्रभूदेशपांडे यांच्या पुतळ्यापर्यंत आयोजक संस्थांचे मोजके पदाधिकारी यात सहभागी होतील. पावनखिंड परिसरात खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते धारातीर्थी भूमीचे पूजन झाले. 

हे पण वाचा - कोल्हापूरात लॉकडाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील  

भूगर्भशास्त्रातील संशोधकांनी घळीचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. भूगर्भीय महत्त्वाच्या दृष्टीने नवा पैलू समोर येईल. घळीत युद्ध झालेले नाही, असे आम्ही दरवर्षीच्या मोहिमेत मोहीमवीरांना सांगतो. तसेच घळीच्या वरच्या बाजूला जो फरसबंदीचा मार्ग आहे, तेथेच पूजनाचा कार्यक्रम करतो. 

- हेमंत साळोखे, अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान

इतिहासातील प्रसंग चुकीच्या पद्धतीने नव्या पिढीसमोर जाणे दुर्दैवी आहे. ही घळ म्हणजेच पावनखिंड, असे सांगितले जाते. त्यातूनच गैरसमज पसरले जातात. त्यामुळे घळ कधी निर्माण झाली, भूगर्भात कोणत्या हालचाली घडल्या असाव्यात, याविषयी अभ्यास होणे आवश्‍यक आहे. 
- नितीन देवेकर, अध्यक्ष, गडकोट गिर्यारोहक.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavankhind parasbandi road and Kasari river