भावानो... चला येताय काय शिकारीला ...? फक्त दोन रुपयांचा गळ अन शिकार पक्की...

आनंद जगताप
रविवार, 28 जून 2020

पन्‍हाळा परिसरातच काय तालुक्‍यात गल्‍लोगल्‍ली एकच हाक ऐकू येतेय... चला.. शिकारीला येताय काय...?     

पन्‍हाळा - दिवस लॉकडाउनचे आहेत. व्‍यवसाय,धंदे,छोटे छोटे स्‍टॉल बंद आहेत. तब्‍बल तीन महिने घरात बसून बसून कंटाळा आलाय. त्‍यात जून संपत आलाय तरी  धुवॉंधार  पाउसही नाही. आकाशात नुसतेच ढग येताहेत  नि आशा लावून जाताहेत. दररोज तीच तीच भाजी खावून कंटाळा आलाय. बाजारातनं भाजी आणली तरी ती सॅनिटायजर मारून पिशवी घरात घ्‍यावी लागतेय. घरात भाज्‍या मिठाच्‍या पाण्‍याने घुवून घ्‍याव्‍या लागताहेत.. साहजिकच तोंडाला चव नाही.रिकामा वेळही पाहिजे तेवढा आहे.त्‍यातच आषाढ सुरु झालायं. पुढच्‍या महिन्‍यात श्रावण महिना पाळयचाय. श्रावण संपला की लगेच गणेश चतुर्थी येतेय. याकाळातही घरात वशाट आणून देणार नाहीत. त्‍यामुळे पन्‍हाळा परिसरातच काय तालुक्‍यात गल्‍लोगल्‍ली एकच हाक ऐकू येतेय... चला.. शिकारीला येताय काय...?     

दचकून जावू नका... शेजा-या पाजा-या मित्रांना एवढे अगत्‍याचे निमंत्रण दिले जातेय ते काही ससे, भेकर, डुक्‍कर अगर रानकोंबडया, अगर तितरची शिकार करायला नाही, तर ओढयाकाठी, नदीकाठी मासे अगर खेकडे पकडायला अगत्‍याने बोलावले जातेय. या दिवसात नदीत, तलावात अगर ओढयात मासे,खेकडे भरपूर प्रमाणात मिळतात. बरे, त्‍यांना पकडायला शासनाची परवानगीही लागत नाही की कोणी शक्‍यतो अडवतही नाही...

वाचा - भारीच की पैलवान मंडळी ! राजर्षी शाहू जयंती निमित्त गंगावेशच्या मल्लांनी केला 'हा' संकल्प...

हां.. एखादा तलाव भेाई लोकांनी लिलावाने घेतला असेल तर मात्र मासे पकडताना निश्चित अडवले जाणार..    खेकडे, मासे चवीने खाणा-यांची संख्‍या गावोगावी मोठया प्रमाणात आहे.खेकडे अगर मासे पकडायला बंदूक, भाला अगर अन्‍य हत्‍यारही काही लागत नाही. मासे पकडण्‍यासाठी दोन रुपयांचा गळ, प्‍लास्टिक दोरा, गव्‍हाची कणिक अगर या दिवसात कुठेही थोडेसे उकरले की जमीनीखाली भरपूर प्रमाणात मिळणारे गांडूळ आणि एखादी छडी असली की बस्‍स.. तर खेकडे पकडायला गवताची मोठी काडी आणि बॅटरी असली की झाले...

मासे पकडण्‍यासाठी शक्‍यतो दिवसा आणि खेकडे पकडण्‍यासाठी अंधाराची वेळ निवडली जाते. मासे पकडणे तसे सोपे. तलावाकाठी अगर ओढयाकाठी बसून छडीला दोरा बांधून आणि हुक अडकवून या हुकला कणिक अगर गांडूळ लावून पाण्‍यात टाकले की झाले.या खादयाकडे पाण्‍यातून इकडून तिकडे फिरणारे मासे आपोआप आक्रुष्‍ट होतात आणि गळाला लागतात. हा गळ मासे दूरवर ओढून नेण्‍याचा प्रयत्‍न करतात ते हळू हळू गळाचा दोरा ओढून घेतात आणि गळ  घशात अडकल्‍याने सुटकेसाठी तडफडणारा मासा अलगद गळातून बाहेर काढून पिशवीत टाकतात. खेकडयासाठी मात्र बरेच परिश्रम करावे लागतात. त्‍यासाठी खेकडयाचे बीळ शोधावे लागते.चाहूल लागली की खेकडा बीळात घुसतो. त्‍याला बाहेर काढण्‍यासाठी गवताची जाड काडी चिंबवून बिळात घालून हलवावी लागते.काहीतरी खादय आहे असे समजून खेकडा आपल्‍या मोठया नांग्‍यानी काडी गच्‍च पकडतो आणि याचवेळी काडी हहूहळू बाहेर काढून खेकडयावर हाताची झडप घालावी लागते आणि बॅटरीच्‍या उजेडात त्‍यांच्‍या नांग्‍या मोडून त्‍याला पिशवीत टाकले जाते.हाताची झडप खेकडयावर व्‍यवस्थित बसली तर ठीक नाही तर एखादे बोट खेकडयाच्‍या नांग्‍यानी फोडलेच म्‍हणून समजायचे.त्‍यामुळे खेकडे पकडणे हे काही येरागबाळयाचे काम नाही...

वाचा - लई भारी ! ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या शूटिंगचा पुन्हा श्रीगणेशा ; कोल्हापूर आता शूटिंग डेस्टिनेशन...

हां... पण एवढे परिश्रम करून पकडलेल्‍या माशांचा आणि खेकडयांचा रस्‍सा खव्‍ययाना खाताना एकदम वेगळीच मजा देवून जातो... सर्दीच्‍या निमित्‍ताने रश्‍याच्‍या  वाटयावर वाटया रिकाम्‍या होतात.घरच्‍या घरधनिनीला  आणि पोरांबाळांनाही या निमित्‍ताने मेजवानी मिळते....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are fishing in Kolhapur area

टॅग्स
टॉपिकस