शासकीय रुग्णालयांचे फायर, इलेक्‍ट्रीकल ऑडीट करा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ तयार करावेत

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर तसेच इलेक्‍ट्रीकल ऑडीट करावे. तसेच, ऑडीटसाठी लागणारा खर्च आपत्ती व्यवस्थापनमधून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. 

काही दिवसापूर्वी सीपीआर तसेच सध्या भंडारा येथील शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी उद्भवलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज आणि आयजीएम रुग्णालय इचलकरंजी या तीनही ठिकाणच्या फायर ऑडिट (अग्नीसुरक्षा) तसेच विद्युत सुरक्षेच्या अनुषंगाने समित्या स्थापन केल्या आहेत. याची आज आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ तयार करावेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आवश्‍यक आणि अपेक्षीत सर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले जावे. त्याची रंगीत तालीमही घ्यावी. त्यासाठी लागणारा सर्व खर्च आपत्ती व्यवस्थापनामधून दिला जावा. शासकीय रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या यंत्र सामुग्रीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करुन द्यावे. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी राज्य शासनाकडे केली जाईल. त्यामुळे तात्काळ याचे नियोजन करुन फायर ऑडिट पूर्ण करण्याचे आदेशही श्री देसाई यांनी दिले. यावेळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुश कावळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. व्ही. बी, बर्गे उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Perform fire electrical audit of government hospitals kolhapur collector