कोल्हापुरातील मराठा आंदोलन भरवणार शासनाला धडकी

 संदीप खांडेकर
Tuesday, 15 September 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक व शासनाला धडकी भरवणारे करण्यासाठी मराठ्यांनो सज्ज रहा, असे आवाहन केले असून, योग्य वेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात एकाचवेळी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली असून, राजर्षी शाहूंच्या विचाराचे आरक्षण मिळविण्यासाठी मराठ्यांचा एल्गार पुकारण्यासाठी सर्वांशी आॅनलाईन संपर्क सुरू झाला आहे. तालुक्यातील समन्वयकांच्या बैठकीत जिल्हास्तरीय एकच निर्णायक भूमिका घेऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे ‌पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षण स्थगिती निर्णय दुर्दैवी आहे. निर्णय देताना मराठ्यांसाठी वेगळा न्याय दिल्याचे स्पष्ट होते. हा सारासार अन्याय आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त मराठ्यांमध्ये असंतोष खदखदत असून पुन्हा लढ्यास सज्ज राहावे लागणार आहे. पण, जीवघेण्या कोरोनाचा कहर व संसर्ग  लक्षात घेवून संसर्ग होऊ नये यास्तव रस्त्यावरील लढ्याची दिशा बदलावी लागणार आहे. यासाठी  कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कागल, मुरगूड, कुरूंदवाड, हातकणंगले, गडहिंंग्लज, आजरा, वडगांव, राशिवडे, राधानगरी, बांबवडे, कोडोली शहरातील सकल मराठा समन्वयकाच्या बैठकीत जिल्हास्तरीय एकच निर्णायक भूमिका घेऊन पुन्हा लढ्याची तयारी सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक व शासनाला धडकी भरवणारे करण्यासाठी मराठ्यांनो सज्ज रहा, असे आवाहन केले असून, योग्य वेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

हे पण वाचा -  7899 हाच नंबर ठरला ॲड. शिंदे यांच्यासाठी विजयाची निशाणी 

 पत्रकावर वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, 
दिलीप देसाई, अॅड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, संदीप देसाई, संजय जाधव, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, कमलाकर जगदाळे, सुशिल भांदिगरे, विकास जाधव, श्रीधर गाडगीळ, उदय भोसले, युवराज जाधव, मयूर पाटील, शशिकांत पाटील, चंद्रकांत बराले, उत्तम जाधव, चंद्रमोहन पाटील, संजय काटकर, संजय जाधव, प्रताप नाईक, प्रशांत बरगे, अवधूत पाटील यांची नावे आहेत.

हे पण वाचाइंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: planning for maratha reservation protest in kolhapur district