धक्कादायक : जिल्हाधिकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून पोलिसाने केली आत्महत्या...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

गुरण्णावर राखीव दलात सेवा बजावीत. मंगळवारी त्यांच्याकडे विश्‍वेश्‍वरय्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा बजाविण्याची जबाबदारी होती.

बेळगाव - विश्‍वेश्‍वरय्यानगरमधील जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्या निवासस्थानी सेवा बजावणाऱ्या राखीव दलातील पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना आज (ता.6) सकाळी उघडकीस आली. स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकाश गुरण्णवर (वय 32) असे त्याचे नाव आहे.

मयत गुरण्णावर राखीव दलात सेवा बजावीत. मंगळवारी त्यांच्याकडे विश्‍वेश्‍वरय्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा बजाविण्याची जबाबदारी होती. त्यानुसार सेवा त्यांनी बजावीत असताना आज (ता.6) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविले आहे. गुरण्णावराचे मुळगाव कित्तूर तालुका अंबडगट्टी. 2008 पासून राखीव दलात सेवा बजावीत. डोक्‍यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेने पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

वाचा - भरधाव मोटार दुकानात घुसली आणि...

जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी आज (ता.6) सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी दिवसभरातील नियोजन, प्रशासकीय कामकाज आणि कोविड-19 याची माहिती घेत असताना या घटनेची माहिती मिळाली. लागलीच निवासस्थानाहून बाहेर येऊन मुख्य प्रवेशमार्गावर पोचले. घटनास्थळी भेट दिली. पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस आणि एपीएमसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना पंचनाम्याबाबत सूचना दिल्या. आत्महत्या आणि एकूण सदर घटनेच्या पाठीमागील नेमके कारण कळू शकले नाही. त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीएमसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police shot himself in belgaum collector residential area