हातकणंगलेच्या सभापतिपदी "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील

अतुल मंडपे
Saturday, 23 January 2021

पडद्यामागील नाट्यपूर्ण घडामोडी आणि भारतीय जनता पक्ष-महाडिक समर्थकांच्या नाराजी नाट्यामुळे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची माळ अखेरीस आज "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील (टोप) यांच्या गळ्यात पडली.

हातकणंगले : पडद्यामागील नाट्यपूर्ण घडामोडी आणि भारतीय जनता पक्ष-महाडिक समर्थकांच्या नाराजी नाट्यामुळे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदाची माळ अखेरीस आज "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील (टोप) यांच्या गळ्यात पडली. सभापतिपदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीच्या सभाध्यक्षपदी तहसीलदार प्रदीप उबाळे होते. सभापती निवडीनंतर "जनसुराज्य'च्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. 

हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी आज दुपारी पंचायत समिती सभागृहात विशेष सभा झाली. त्रिशंकू सभागृहात कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने "जनसुराज्य'चे पाच आणि भाजपच्या सहा सदस्यांची काल (ता. 21) रात्री कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. भाजपमध्ये महाडिक समर्थक आणि हाळवणकर समर्थकांमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीला बरोबर घेण्यावरून वादंग झाले.

हाळवणकर समर्थकांनी आवाडे गटाला बरोबर घेतल्यास तीन सदस्य निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार, यावर ठाम राहिले. महाडिक समर्थक भाजप सदस्य उत्तम सावंत यांनाच पाहिल्यांदा सभापतिपद मिळावे, यावर ठाम होते. अखेर या वादावादीत सभापतिपद "जनसुराज्य'कडे देण्याचा निर्णय झाला आणि सभापतिपदी "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. 

सभापती बिनविरोध निवडीचे वारणा केंद्र 
हातकणंगले पंचायत समितीच्या 22 सदस्यांमध्ये "जनसुराज्य'चे केवळ पाच सदस्य आहेत. "जनसुराज्य'ला सातत्याने विरोध होत असताना प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी भाजपसह सर्वच पक्षांच्या वरिष्ठांपर्यंत संपर्क साधून बिनविरोधसाठी प्रयत्न केल्याने "जनसुराज्य'चे डॉ. प्रदीप पाटील बिनविरोध सभापती झाले. त्यामुळे गेले काही दिवस सभापती निवडीचे "वारणा' हे केंद्र बनले होते. 
 

यांच्या भूमिका ठरल्या निर्णायक 
बिनविरोधसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, "जनसुराज्य'चे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, "जनसुराज्य'चे प्रदेशाध्यक्ष समित कदम, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने आदींची भूमिका निर्णायक ठरली. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradip Patil Elected As A President Of Hatkanangale Panchayat Samiti Kolhapur Marathi News