esakal |  इदरगंज पठारावरील खजिना खुला होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

 prakash abitkar Inspection on kolhapur Didarganj Plateau

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील इदरगंज पठाराचे क्षेत्रफळ हे कास पठाराच्या कित्येक पटीने विस्तीर्ण असून पश्‍चिम घाटातील अतिसंवेदनशील असणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे.

 इदरगंज पठारावरील खजिना खुला होणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पठाराची पाहणी केली. 

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील इदरगंज पठाराचे क्षेत्रफळ हे कास पठाराच्या कित्येक पटीने विस्तीर्ण असून पश्‍चिम घाटातील अतिसंवेदनशील असणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. पठारावर जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान शेकडो जातींची फुलांची उगवण होते. यामुळे परिसर अधिकच नयनरम्य होतो. येथे फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांमुळे मोठ्या प्रमाणात विविध जातींची फुलपाखरे पाहावयास मिळतात. इदरगंज पठार पर्यटकसांठी खुले केल्यास पर्यटन विकासाला चालना मिळण्याच्या उद्देशाने आमदार प्रकाश आबिटकर यांनी पठाराची पाहणी केली. 

आमदार आबिटकर म्हणाले, ""जैवविविधतेने संपन्न राधानगरी वन्यजीव अभायारण्यातील इदरगंज पठार हा अतिशय महत्वाचा घटक आहे. पठाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कासपठाराप्रमाणे इथंही विविध रंगांची गवतफुलं फुलतात. त्यामुळे वेडावून टाकणाऱ्या या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्याकरीता हा भाग विकसीत करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव करण्याच्या सूचना वनविभागास दिल्या आहेत. 

जि.प.चे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, सरपंच धनाजी खोत, विभागीय वनअधिकारी विशाल माळी, वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, सहाय्यक वनरक्षक अनिल जेरे, लेखापाल राजेंद्र सावंत यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

हे पण वाचाकंगणाचा पाय खोलात ; एफआयआर दाखल करून घेण्याचे न्यायालयाचे निर्देश

औषधी वनस्पती मुबलक 
इदरगंज पठारावर पश्‍चिम घाटातील अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. पठारावर प्रामुख्याने पांढऱ्या आणि निळ्या रंगाची गेंदी, जांभळ्या रंगाची सीतेची आसवं, गुलाबी रंगाचा तेरड्याचा सडया अशी अनेक फुलं पाहून डोळ्यांच पारणं फिटतं. 

संपादन - धनाजी सुर्वे