चर्चमध्ये प्रार्थना, मशिदीत नमाज सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

मार्च ते मेपर्यंत हा लॉकडाऊन कडक करण्यात आला होता

कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडण्याचा आदेश दिल्यानंतर आज पहिल्याच शुक्रवारी मशिदीत नमाज पठण तर चर्चमध्ये प्रार्थना सुरू झाली. मंदिरातील दर्शनाबरोबरच प्रार्थनास्थळावरही आज समाज बांधवाची गर्दी पहायला मिळाली. 

कोल्हापुरात 22 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. त्यानंतर 23 मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आणि देशातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात मंदीरासह मशीद, चर्चसह इतर प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आली होती. मार्च ते मेपर्यंत हा लॉकडाऊन कडक करण्यात आला होता. या काळात आलेल्या जोबिबाच्या यात्रेसह गावगावच्या यात्रा आणि नवरात्सोवातील कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जसा कमी होईल तसे टप्प्याटप्प्याने काही निर्बंध हटवण्यात आले. पण मंदिर, प्रार्थनास्थळे मात्र बंदच होती. ही मंदिरे उघडावीत यासाठी भाजपासह इतर धार्मिक संघटनांनी आंदोलनेही केली, पण सरकार मंदिरे बंद ठेवण्यावर ठाम होते. 

दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्यातील सर्व मंदिरासह प्रार्थनास्थळेही उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्याननुसार पाडव्याला मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली. मशिदीत दर शुक्रवारी तर चर्चमध्ये दर शुक्रवार व रविवारी प्रार्थना असते. या निर्णयानंतर आलेल्या आजच्या पहिल्या शुक्रवारी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डींगमध्ये खुल्या पटांगणावर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत कोरोनापासून मुक्तीसाठी प्रार्थना केली. सायंकाळी काही चर्चमध्येही प्रार्थना झाली. 

हे पण वाचाजोतिबा मालिकेचा वाद आता मुंबईत तो ही राज दरबारी

अन्नछत्रही झाले सुरू 
महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने अंबाबाई मंदीर परिसरात अन्नछत्र चालवले जाते. कोरोना काळात हे अन्नछत्र बंद होते. आजपासून हे अन्नछत्रही सुरू झाले. आज पहिल्या दिवशी सुमारे एक हजार भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prayers in church prayers continue in mosque