Problems Faced By Forest Workers In Chandgad Taluka Kolhapur Marathi News
Problems Faced By Forest Workers In Chandgad Taluka Kolhapur Marathi News

इकडे वन्यजीव नियम, तिकडे शेतीचे नुकसान; दुहेरी कात्रीत वन कर्मचारी

चंदगड : पार्ले (ता. चंदगड) जंगल हद्दित हत्तींच्या कळपावर पाळत ठेवण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर टस्कराने हल्ला केला. सुदैवाने तो लगेच माघारी परतल्यामुळे दुर्घटना टळली. मात्र या प्रसंगाने कर्मचाऱ्यांची अवस्था प्रकर्षाने स्पष्ट झाली. वन्यजीव नियम आणि शेतीचे नुकसान या कात्रीत सामान्य कर्मचाऱ्यांचा बळी जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासंदर्भाने हत्तींचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ठोस उपापयोजनेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

तालुक्‍यात हत्तींचा वावर सुरू होऊन आता दिड दशकाचा कालावधी उलटला आहे. गवे, रानडुक्कर, अस्वल याप्रमाणे हत्ती सुध्दा आता इथलाच झालाय. शेतकऱ्यांना याचे भान आहे. परंतु ऐन सुगीच्या तोंडावर कष्टाने घेतलेले पिक हत्तींकडून उध्वस्त व्हायला लागले की, शेतकरी अस्वस्थ होतात. अशा वेळी वन विभागावर राग निघतो. "तुमचे हत्ती, तुमच्या ताब्यात घ्या, आमच्या हद्दित सोडू नका' अशा थेट प्रतिक्रीया व्यक्त होतात. वन कार्यालयावर मोर्चे निघतात. स्थानिक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवण्याचे प्रकार घडतात.

वरिष्ठांपर्यंत न्याय जातो. त्यांचीही अडचण होते. कारण वन्यजीव नियमांच्या आधारे प्राण्यांना हुसकावणे हा सुध्दा गुन्हा आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा रोष थांबवायचा असेल, तर काहीतरी प्रयत्न गरजेचे ठरतात. त्यातूनच साधारण मार्ग म्हणून हत्तींच्या कळपावर "पाळत' ठेवली जाते. एकाच विभागात सातत्याने नुकसान टाळण्यासाठी या कळपाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात ज्या विभागात ते जातील तिथे नुकसान होतेच.

पाळत ठेवताना वन कर्मचारी हत्तींच्या पाऊलखुणांच्या आधारे जंगलात मागोवा घेतात. ढोल, फटाके वाजवून त्यांना पुढच्या दिशेला सरकवले जाते. मात्र जंगलात अनेकदा गर्द झाडीत हत्तींचे अस्तित्व जाणवून येत नाही. अचानकपणे ते हल्ला करू शकतात. घनदाट जंगल, निमुळत्या आणि निसरड्या वाटा विचारात घेता गंभीर स्थिती उद्बवू शकते. 

अभयारण्य, कॉरीडॉरची केवळ चर्चा 
हत्तींचा प्रश्‍न सोडवण्यासाठी अभयारण्य, हत्तींचा कॉरीडॉर निश्‍चित करणे, जंगलाला सौर कुंपण करणे यासारख्या उपाययोजनांबरोबरच पिकांची बाजारभावाप्रमाणे शंभर टक्के भरपाई देण्याबाबत चर्चा झाल्या. परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही नाही. शेतकरी आणि वन कर्मचारी यांच्या दृष्टीने हा प्रश्‍न सोडवण्यासाठी ठोस उपाय अंमलात आणण्याची गरज आहे.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com