कोल्हापुरात शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

आदेशाचा निषेध करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले.

कोल्हापूर  : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज तीव्र निदर्शने केली. या वेळी मुख्याध्यापक, प्राचार्य व लिपिकांच्या सप्टेंबरमधील वेतन स्थगित करण्याच्या आदेशाची होळी केली. 
जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 5 वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना शाळेची माहिती पाठवावी, असा आदेश दिला आहे. आदेशात माहिती न पाठविल्यास संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, लिपिकांचे सप्टेंबरचे वेतन स्थगित करण्यात येईल व संस्थेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. आदेशाचा निषेध करण्यासाठी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण क्षेत्राला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करत निदर्शने केली. 

व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, वसंतराव देशमुख, प्रा. जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड , शिवाजी माळकर, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, पी. एस. हेरवाडे , प्राचार्य एन. आर. भोसले, उदय पाटील, राजेश वरक, आर. डी. पाटील, ए .ए. अन्सारी, शिवाजी कोरवी, रवींद्र भोसले, मिलिंद बारवडे, संजय नवाळे, अनिता नवाळे, सारिका यादव, जगदीश शिर्के, पंडित पवार, राजेद्र सूर्यवंशी, अजित रणदिवे, मिलिंद पांगिरेकर, एम. जी. पाटील, दत्तात्रय चौगुले, अशोक पाटील, एम. एन. पाटील, प्रा. समीर घोरपडे निदर्शनात सहभागी झाले होते. 

हे पण वाचाजिल्हाधिकाऱ्यांनी गाठला हरपवडे धनगरवाडा

 

पेन्शनधारकांची पिळवणूक 
वेतन पथक कार्यालयात पेन्शनधारकांची आर्थिक पिळवणूक करून तेथे भ्रष्टाचार बोकाळला आहे. पेन्शन धारकांकडून प्रॉव्हिडंड फंडसाठी हजारो रुपये वसूल केले जात आहेत. माध्यमिक विभागामध्ये वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतन श्रेणी निवड, श्रेणी मुख्याध्यापक नेमणुकांना मान्यता विषयांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, असे समजते. तेव्हा याबद्दलची गांभीर्याने चौकशी व्हावी, अशा आशयाचे लेखी निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, नायब तहसीलदार अनंत गुरव, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protests against education officials in Kolhapur