आंतरराष्ट्रीय टॅक्‍सेशन परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवला कोल्हापूरच्या 'या' युवकाने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

टॅक्‍सेशन परीक्षेत ‘रजत’ कामगिरी
देशात पहिला येण्याचा मान; आंतरराष्ट्रीय करप्रणालीचा अभ्यास

कोल्हापूर : कोल्हापुरातील तरुण चार्टर्ड अकौंटंट रजत संभाजी पोवार याने इंटरनॅशनल टॅक्‍सेशन परीक्षेत भारतात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. रजत पोवारच्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. लहान वयात हे यश संपादन करणारा रजत हा कोल्हापूर नजीकच्या उचगावचा असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने हे कुटुंब राजारामपुरी येथे स्थायिक आहे. या क्षेत्रात डायनॅमिक बदल होत असून बदलांना सतत सामोरे जात आंतरराष्ट्रीय करप्रणालीचा अभ्यास रजतने केला आहे.

उचगाव येथील प्रसिध्द चार्टर्ड अकौंटट संभाजीराव शंकर पोवार यांचा रजत मुलगा आहे. सध्या हा परिवार व्यवसायाच्या निमित्ताने राजारामपुरी येथे स्थायिक आहे. रजतला लहानपणापासूनच गणिताची आवड आहे. तो येथील सेंट झेवियर्स हायस्कूलचा विद्यार्थी आहे. दहावीच्या परीक्षेत त्याला ९७.८२ टक्के गुण मिळविले होते. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी कॉमर्स शाखा निवडली.

हेही वाचा- अतिगंभीर रुग्णांसाठी ठरणार वरदान डॉ. मेघनाद जोशी यांचे संशोधन
 
बारावीच्या परीक्षेत त्याला ८७ टक्के गुण मिळाले. बीकॉम करत असतानाच त्याने चार्टर्ड अकौंटट होण्याचा संकल्प करत या परीक्षाही दिल्या. विसाव्या वर्षीच रजत चार्टर्ड अकौंटट झाला. हे शिक्षणदेखील त्याने अतिशय कमी वयातच पूर्ण केले. त्यानंतर त्यांने इंटरनॅशनल टॅक्‍सेशन परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जगभरामध्ये प्राप्तिकराची स्थिती आहे. कोठे काय बदल होत आहेत, याचा सूक्ष्म अभ्यास  केला. नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल टॅक्‍सेशन परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन करत भारतात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. 

हेही वाचा- अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी मंत्री सरसावले

वडील चार्टर्ड अकौंटट असल्यामुळे गणिताची आवड झाली. वडिलांचा आदर्श ठेवला आणि चार्टर्ड अकौंटट व्हायचे, असा संकल्प केला. त्यानुसार त्यात मला यश आले. आता मला इंटरनॅशनल टॅक्‍सेशनच्या परीक्षेतही चांगले यश मिळाले आहे. हे क्षेत्र आव्हानात्मक असून रोज नवे बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम जगावर होतो. त्याचा अभ्यास या परीक्षेसाठी केला आहे.
- रजत पोवार

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajat Sambhaji Powar first in India in the International Taxation Examination kolhapur marathi news