रंगली बासरी, गायनाची जुगलबंदी ः पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन

Rangali flute, jugalbandi of singing: Pannalal Ghosh Smriti Sangeet Sammelan
Rangali flute, jugalbandi of singing: Pannalal Ghosh Smriti Sangeet Sammelan

कोल्हापूर ः बासरी आणि गायनाच्या अनोख्या जुगलबंदीत आज येथे पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन रंगले. भोपाळचे प्रसिध्द बासरीवादक पंडित अभय फगरे यांना यंदाच्या पंडित पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रसिध्द बासरीवादक नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. देवल क्‍लबच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सजलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम झाला. 
पंडित फगरे सध्या भोपाळ आकाशवाणीत कार्यरत असून रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, मोरोक्को, ब्राझिल, न्यूझीलंड आदी ठिकाणी क्‍यांच्या मैफली झाल्या आहेत. पुरस्काराविषयी ते म्हणाले, ""भारतीय बासरीवादनाच्या इतिहासात पंडित पन्नालाल घोष यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. मात्र, त्याबरोबरच आता जबाबदारीही वाढली आहे.'' 
मुख्य कार्यक्रमानंतर बासरीवादक अनुपम वानखेडे यांची बासरी आणि गायक सारंग फगरे यांच्या गायनाची अनोखी जुगलबंदी रंगली. त्यांनी सुरवातीला "राग बिहाग' सादर केला. विलंबित एकताल आणि द्रुत त्रितालातील रचना सादर झाल्यानंतर त्यांनी एक धून सादर केली. त्यानंतर पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या बासरीवादनाची मैफलही सजली. त्यांनी सुरवातीला "राग बागेश्री' सादर केला. त्यानंतर पंडित पन्नालाल घोष यांनी तयार केलेला "राग दीपावली' हा अनवट राग पेश केला. त्यांना गिरीधर कुलकर्णी, प्रशांत देसाई यांची तबला तर योगेश तावडे यांची तानपुरा साथ होती. 
संयोजक प्रा. सचिन जगताप यांनी बासरीचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी संगीत संमेलनाबरोबरच बासरी वादनाची मोफत शिबिरेही आजवर घेतली असून पुरस्काराच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांना येथे निमंत्रित केले जाते, असे सांगितले. दरम्यान, देवल क्‍लबचे श्रीकांत डिग्रजकर यावेळी उपस्थित होते. माधवी देशपांडे यांनी स्वागत केले.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com