
पोलिसांनी या दरोडेखोरांचा पाठलाग केला असता पिकाच्या आडोशाने विमानतळाच्या दिशेला पळून जाण्यात या दरोडेखोरांना यश आले
उजळाईवाडी (कोल्हापूर) : येथील महामार्ग पोलिसांकडून कसुरदार वाहनांवर कारवाई करत असताना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड दिशेकडून येणारी व बेंगलोर दिशेला जाणारी इनोवा ( क्र. के ए 35 ए 31 68) कारमधील सहा जणांनी महामार्गालगत असलेल्या शाळवाच्या शेतात डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गाडीचे दरवाजे उघडून पोबारा केला. महामार्ग पोलिसांनी या दरोडेखोरांचा पाठलाग केला असता पिकाच्या आडोशाने विमानतळाच्या दिशेला पळून जाण्यात या दरोडेखोरांना यश आले. संशयावरून गाडीची तपासणी केली. गाडीमध्ये दरोड्यासाठी लागणारी घातक हत्यारे व इतर साहित्य आढळून आले. यामध्ये गावठी कट्टा , गॅस कटर, कटावण्या व इनोवा कार आदी मुद्देमाल जप्त केला.
यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, महामार्ग पोलिस मदत केंद्राचे जगनाथ जानकर, पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, ट्राफिक पोलिस, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस कर्मचारी, यांनी तातडीने एकमेकांशी संवाद साधून महालक्ष्मी नगर मार्गे गोकुळ शिरगाव हद्द व विमानतळ हद्दीतील तामगाव तलावपर्यत पाठलाग केला. परंतु, दरोडेखोर मिळून आले नाहीत.
यावेळी जप्त करण्यात आलेली गाडी व मुद्देमाल महामार्ग पोलिसांनी पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
हे पण वाचा - येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल
दरोड्याचे साहित्य जप्त
दोन गावठी कट्टे, गॅस पाना, गॅस रेग्युलेटर, गॅस नेपल, कटावनी ,स्क्रू ड्रायव्हर, पकड ,परफ्युम ,गॅस कटर ,दोन मोठे मारतुल, एक्सो फ्रेम, एक्सो ब्लेड, दोन गॅस, निप्पल ऍडजेस्ट, पाना लोखंडी, पहार, पाच क्लिप्स, पेन ड्राईव्ह, गाडीचे किचन, पाच किलो गॅस टाकी, गॅस पाईप ,जॅक टॉमी, टूलबॉक्स, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल, पांढऱ्या रंगाची इनोवा कार असा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला
मोठ्या दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीचा प्रयत्न महामार्गावरील तपासणी पथकाच्या सजगतेने मुळे उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
संपादन - धनाजी सुर्वे