व्हिडीओ : श्रावणा आधी कोल्हापुरात आखला जातो 'हा' देशी बेत...

अमोल सावंत
रविवार, 12 जुलै 2020

गावरान कोंबड्यांबरोबर काही विशिष्ट जातीच्या कोंबड्या ही विक्रीसाठी उपलब्ध असतात.

कोल्हापूर - अहो, अण्णा, दादाऽऽ मामाऽऽ. ये मावशी...! घे की, कोंबडा अन्‌ कोंबडी. कोंबडा, कोंबडी दोन्ही बी घे. दर बसवून देतो घेऽऽऽ ये ये, तसं पुढं जाऊ नको. घे. तुला जी आवडती ती कोंबडी, कोंबडा घे. असा कोलाहाल आज सकाळपासून लक्ष्मीपुरीतील शिवाजी तंत्रनिकेतनच्या बाजूला, मटण मार्केट परिसरात दिसत होते. निमित्त होते, कोंबडी बाजाराचे. 27 जुलैला श्रावण सोमवाराला प्रारंभ होत आहे. त्याआधी 20 तारखेला दर्श अमावस्या आहे. म्हणजे, दर्श अमावस्या किंवा 26 जुलैच्या (रविवार) आधी अनेक लोक मांसाहार खातात. कोंबडी, कोंबड्यांच्या रस्स्यावर ताव करतात. यासाठी अनेकजण कोंबडी, कोंबडा घेण्यासाठी आले होते; मात्र कोविड-19 चा प्रभाव खूप असल्यामुळे अनेकजण कोंबडी बाजारात फिरकले ही नाहीत. तुलनेने गर्दीही कमी होती.

श्रावणाआधी ताव...

काळी तलंगी, कोंबडा, कोंबडी विक्रीसाठी आले होते. सर्वसाधारणपणे 250 ते 500 रुपयांपर्यंत कोंबडी/कोंबड्यांचा दर होता. छोटी तलंगीचा दर हा 150 रुपये होता. कोंबडी अन्‌ कोंबडा वजनाने जास्त, थोडा मोठा असेल तर किंमतही जास्त होती; पण थोडीसी घासाघीस करुन विक्रेते कोंबडी/कोंबडा विकत देत होते. या कोंबड्या जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातून इथे विक्रीसाठी आणले जातात. श्रावणाला एक आठवडा असल्यामुळे अनेकांनी कोंबड्याच्या रस्सा ओरपण्याचा आनंद लुटला आहे. असा हा कोंबडी बाजार शहरात अनेक ठिकाणी बसतो. सर्वाधिक कोंबड्या विक्रीचे प्रमाण हे लक्ष्मीपुरी, मटण मार्केट परिसरात अधिक असते. खुली विक्रीसाठी गावठी कोंबड्याच ठेवल्या जातात. यात लेगॉन कोंबड्या नसतात. त्या कोणीही घेत नाहीत. श्रावणाआधी गावठी कोंबड्या खाण्याची लज्जतच वेगळी असते.

वाचा - तुम्ही प्लाझ्मा देण्यास पुढे या अन् कोरोनाग्रस्त बरे करा...

गावरान कोंबड्यांबरोबर काही विशिष्ट जातीच्या कोंबड्या ही विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये आरआयआर (ऱ्होड आयलॅन्ड रेड), ब्लॅक अस्ट्रॉलॉर्प, ग्रामप्रिया, देहलम रेड, गिरिराज, वनराज, कडकनाथ, गावठी क्रॉस 70/80 आदी प्रजाती आहेत. यातील कडकनाथ प्रजाती मात्र येथील बाजारात विक्रीसाठी नव्हती. अन्य प्रजाती उपलब्ध होत्या. तरीही अनेकांना यातील प्रजाती माहिती नाहीत. ते मात्र गावठी कोंबडा/कोंबडी द्या, असे विक्रेत्यांना सांगतात. कोविड-19 ची धास्ती जाणवत होती. नगर जिल्ह्यातून येणाऱ्या कोंबड्यांचे प्रमाण ही कमी आहे.

उफराटे पिसाचे कोंबडे दुर्मिळ

उफराटे पिसाचे कोंबडे, तलंगी अलीकडे मिळत नाही. जारण, मारण, अन्य अघोरी विधी, काही देवतांच्या नैवेद्यांसाठी उफराटे पिसाच्या कोंबड्यांना अधिक मागणी असते. विशेत: काळे उफराटे पिसाचे कोंबडे तर खूप महाग ही असते. अनेकजण ते घेण्यासाठी येत असतात. कोणतीही किंमत देऊन ते विकत घेतात. पण चुकून कुणाकडे तरी असली प्रजाती मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sale rate of hens is higher in Laxmipuri Matan Market area kolhapur