Video:जेव्हा संभाजीराजे छत्रपती शेतात भात पेरणी करतात; शेअर केला अनुभव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केर्ले येथे शेतकऱ्यांसोबत शेतीकामाचा अनुभव घेतला.

कोल्हापूर, ता. 13 : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा शेतात तिफण (खुरी) ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आज सुपरहिट ठरला. केर्ले (ता. करवीर) येथे त्यांनी शेतकऱ्यांसमवेत शेतीकामाचा अनुभव घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तर झालाच, शिवाय फेसबूकवर तीन तासांत दीड लाखांवर व्ह्यूज मिळाल्या. 

संभाजीराजे गेळवडे येथील शेतातून कोल्हापुरात गाडीतून परतत होते. केर्ले येथे आल्यानंतर शेतकरी शेतात पेरणी करताना त्यांना दिसले. ते दृश्‍य पाहत असताना गाडी पुढे गेली. संभाजीराजे यांनी तत्काळ चालकाला पुन्हा गाडी मागे घ्यायला सांगितली. गाडीला टर्न मारून गाडी रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर तोंडावर मास्क लावलेले संभाजीराजे थेट शेतात गेले.

हे वाचा - कोरोनासह जगायची सवय लावायला हवी...

शेतकऱ्याला शेतीकामात किती कष्ट सोसावे लागतात, याचा अनुभव घेण्याच्या इराद्याने तिफण ओढू लागले. ती ओढत असताना त्यांचा श्‍वास फुलला. नाकावरचा मास्क बाजूला ठेवून त्यांनी तिफण ओढली. 
संभाजीराजे यांनी शेती कामातील हा अनुभव मनाला आनंद देणारा ठरल्याची प्रतिक्रिया शेतकरी कुटुंबासमोर व्यक्त केली. त्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर चांगलाच गाजला. शेतीकामात ते गुंतलेले पाहून त्यांच्या कामाचे कौतुक तर झालेच, शिवाय कमेंटसचा पाऊस पडला.

हे वाचा : ना मैदान, ना जिम..., सैन्य, पोलिस भरतीचा रस्त्यावर सराव

संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट
शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.(अंगमेहणीतीचे काम नसताना, इतरवेळी सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.) कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही.

मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhajiraje chhatrapati share video working in field with farmers