एकाच वेळी 150 जणांनी नेत्रदानाचा संकल्प करणारी व कुस्तीची परंपरा असणारी फिरंगाई तालीम मंडळ

संदीप खांडेकर  : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

फिरंगाई देवीचा उत्सव, त्र्यंबोली यात्रा, मोहरम, हनुमान जयंती तालमीतर्फे साजरी केली जाते. तालमीचा लौकिक आजही कायम आहे. जुन्या परंपरा सांभाळण्याचे काम तालमीतर्फे केले जाते.

कोल्हापूर : फिरंगाई तालीम मंडळ हैदर तालीम मंडळाने ओळखले जात होते. फिरंगाई देवीच्या नावावरून तालमीचे नाव फिरंगाई झाले. देवीचे मंदिर परिसरात दिमाखात उभे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भेट दिलेली, स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या रूपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणारी पहिली, एकाच वेळी 150 जणांनी नेत्रदानाचा संकल्प करणारी, पंधरा वर्षे वर्गणी न मागता अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करणारी ही तालीम. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तालमीला जागा दिली. तो इतिहास कार्यकर्ते आजही अभिमानाने सांगतात. 

फिरंगाई देवीच्या नावाने पेटाळ्यात तळे होते. आज त्याच जागी स. म. लोहिया हायस्कूलची इमारत उभी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही तालीम. देशभक्ती रूजविण्याचे काम तालमीने केले. कुस्ती, पटसोंगट्या ते मर्दानी खेळाचा वारसा तालमीला. हिंदूराव जमदाडे, जयसिंगराव इंगवले यांच्यानंतर श्रीपती चौगुले, वसंतराव तडवळे, शामराव जगदाळे व जयसिंग पोहाळकर यांनी कुस्तीची परंपरा सांभाळली. तालमीच्या दत्तपंथी भजनी मंडळाने चांगलेच नाव कमावले. शीघ्र कवी लहरी हैदर, वस्ताद कलगीवाले, (कै) प्रा. विष्णूपंत इंगवले, सदाशिवराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालमीची वाटचाल सुरू राहिली. 
फिरंगाई देवीचा उत्सव, त्र्यंबोली यात्रा, मोहरम, हनुमान जयंती तालमीतर्फे साजरी केली जाते. तालमीचा लौकिक आजही कायम आहे. जुन्या परंपरा सांभाळण्याचे काम तालमीतर्फे केले जाते. राजकीय व सामाजिक चळवळीत तालीम सतत अग्रेसर राहिली आहे. तालमीच्या इमारतीचे नूतनीकरण झाले असून, तालमीसमोरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण झाले आहे. तालमीच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त तालमीच्या एकशे एक्कावन्न कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता, तर शंभर कार्यकर्त्यांनी रक्तदान केले होते. ही परंपरा आता प्रत्येक वर्षी कायम ठेवली आहे. उभा मारूती मंदिरानंतर हे मंदिर प्रसिद्ध असून, येथे प्रत्येक शनिवारी मोठी गर्दी असते. तालमीच्या परिसरातीलच नव्हे तर शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच आवडीच्या क्षेत्रात करियरसाठी तालमीतर्फे युगप्रवर्तक करियर ऍकॅडमीची स्थापना केली आहे. आबा जगदाळे, नंदू तिवले, राजू घोरपडे, उदय माने, जीवन घोरपडे, सुनील जगदाळे, लियाकत मेस्त्री, सर्जेराव माने, सुनील शिंदे, मदन यादव, आदिनाथ सिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली सध्या तालमीचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे पंधरा वर्षांपासून वर्गणी न मागता अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेतले जात आहेत. 

येत्या काळात फिरंगाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार असून, येथे सभा मंडप आणि भक्त निवास बांधून कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांसाठी अत्यल्प शुल्कात निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
रविकिरण इंगवले, अध्यक्ष, फिरंगाई तालीम मंडळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the same time, 150 people decided to donate their eyes and had a tradition of wrestling Firangai Talim