सराव परीक्षेतच विद्यापीठ "फेल' ; विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था  

ओंकार धर्माधिकारी
Friday, 16 October 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कमी कालावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन करावे लागले.

कोल्हापूर - विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा. यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले. मात्र यावेळी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठीतून प्रश्‍नपत्रिका पाठवली. यामध्येही काही प्रश्‍न मराठीतून तर काही प्रश्‍न इंग्रजीतून विचारले होते. अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्‍नही यामध्ये होते. त्यामुळे आधीच तणावाखाली असणारे विद्यार्थी संभ्रमात पडले. सराव परीक्षेतच विद्यापीठ "फेल' झाले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कमी कालावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन करावे लागले. त्याच लेखणी बंद आंदोलन, सॉफ्टवेअर खरेदीला झालेला वेळ यामुळे परीक्षा विभागाची तारांबळच उडाली. विद्यार्थ्यी पहिल्यांदाच ऑनलाईन आणि बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका असणारी परीक्षा देणार असल्याने परीक्षा विभागाने सराव परीक्षा घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस द्वारे प्रश्‍नपत्रिकेची लिंक पाठवली. तसेच त्यांच्या ई-मेलवरही लिंक दिली. लिंक उघडल्यावर विज्ञान विषयांची परीक्षा देणारे विद्यार्थी अवाकच झाले. एरवी इंग्रजीमध्ये परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांना मराठीमधूनच प्रश्‍नपत्रिका पाठवली होती. यामध्येही काही प्रश्‍न इंग्रजी भाषेतील तर काही प्रश्‍न मराठी भाषेतून विचारले होते. अभ्यासक्रमाबाहरेचे प्रश्‍नही यामध्ये होते. ऑनलाईन परीक्षेच्या दडपणाखाली असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका पाहून आणखी दडपण आले; पण ही सराव परीक्षा असल्याने त्यांनी शक्‍य तशी प्रश्‍नपत्रिका सोडवली. असाच गोंधळ मुख्य परीक्षेत झाला तर काय करायचे या विचाराने विद्यार्थी गोंधळात पडले. एकंदरीत सराव परीक्षेत विद्यापीठच फेल झाले. 

हे पण वाचाचुलत भावाच्या खून प्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेप  

परीक्षा नियंत्रकांचा संपर्क नाही 
हा सावळागोंधळ कशामुळे झाला. त्यावर काय उपाय केले जातील. याविषयी माहिती घेण्यासाठी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: science question papers in marathi at shivaji university