अमेरिकेत MH-09 KOP ; कोल्हापुरातील फॅन्सी क्रमांकाची क्रेझ  थेट "न्यू जर्सीत' 

लुमाकांत नलवडे 
Wednesday, 17 February 2021

कागलच्या शंतनू शिंदेचा कोल्हापुरी अभिमान ः डॅशबोर्डवर छत्रपती शिवरायांची मूर्ती 

कोल्हापूर :  "जगात भारी आम्ही कोल्हापुरी' हे काय असते, हे आता थेट अमेरिकेतील "न्यू जर्सी' राज्यातही दिसू लागले आहे. कोल्हापुरात मोटारीच्या क्रमांकावरून नेत्यांची, उद्योगपतींची वाहने ओळखली जातात. जिल्ह्यात वर्षात सुमारे पाच कोटी रुपयांचा महसूल अशा क्रमांकातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळतो. "एमएच 09'ची क्रेझ वाढल्यामुळे कोल्हापुरातच नव्हे, तर पुण्यातही या नावाने हॉटेल आहेत. कोल्हापुरातून पुण्यापर्यंत झालेल्या एमएच 09चा प्रवास आता अमेरिकेत पोचला आहे. मूळचे कागलचे; पण सध्या न्यू जर्सीत राहणारे शंतनू शिंदे यांनी त्यांच्या मोटारीला चक्क MH-09 KOP' हा क्रमांक मिळविला आहे. त्यांच्यामुळे कोल्हापुरातील फॅन्सी क्रमांकाची क्रेझ थेट अमेरिकेत दिसली आहे.

 
शिंदे यांनी सुमारे 45 डॉलर खर्च करून त्यांच्या मोटारीला "MH-09 KOP` हा क्रमांक मिळविला आहे. अमेरिकेत सात "डिजिट'चा कोणताही क्रमांक तुम्ही घेऊ शकता. पूर्वी त्यांच्या मोटारीला त्यांनी "SHINDE` असा त्यांच्या आडनावाचा क्रमांक घेतला होता. मात्र, अलीकडेच घेतलेल्या नव्या मोटारीला या नंबरच्या माध्यमातून कोल्हापूर कनेक्‍टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या समारंभात ते मोटार घेऊन जातात, तेव्हा भारतीय नागरिक मोटारीबरोबर सेल्फी घेतात. 

हेही वाचा- मुलांनो लागा तयारीला ;  एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचा आराखडा कायम

अमेरिकेत जाऊन दहा वर्षे होत आली, तरीही त्यांना कोल्हापूरच्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गणेशभक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या मोटारीच्या डॅशबोर्डवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. रोज त्याची पूजा केली जाते. लॉकडाउनमुळे ते नुकतेच कोल्हापुरात आले होते, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे रेडियमवर रेखाटलेले चित्रही बरोबर घेऊन गेले आहेत. सध्या तेथे बर्फ मोठ्या प्रमाणात पडत असून, ऊन आल्यानंतर तेही मोटारीच्या काचेवर चिटकविणार आहेत. यापूर्वीच्या त्यांच्या मोटारीवर "जय महाराष्ट्र' असे लिहिले होते. 

हेही वाचा- पहाटेपासूनच कोल्हापूरवर पसरली धुक्याची चादर

मी मूळचा कागलचा. पत्नी निशिगंधा उत्तूरची. गेली दहा वर्षे आम्ही अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात राहतो. तेथे गणेशोत्सव, गुढीपाडवा, शिवजयंती साजरी करतो. आम्हाला कोल्हापूरचा अभिमान आहे. त्यामुळेच मी "एमएच 09 केओपी' हा क्रमांक मोटारीला घेतला आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक भारतीय मोटारीसोबत सेल्फी काढतात. अशावेळी कोल्हापूरचा अभिमान वाटतो. 
- शंतनू शिंदे, मूळ कागल, सध्या अमेरिका 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shantanu Shinde Lives in New Jersey number MH-09 KOP for his car vehicle marathi news